जिल्हा कृषी अधीक्षकांचा इस्राईल दौरा; लवकरच प्रशिक्षण
रत्नागिरी:- हापूसच्या नवीन रोपांची लागवड करताना घन पध्दतीचा अवलंब, जुन्या झाडांची उंची कमी करणे यासह आंतरपिकांमधून उत्पन्न वाढ अशा त्रिसुत्रीचा अवलंब इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याच धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षणांचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती इस्त्रायल दौर्यावरुन आलेल्या रत्नागिरी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुर्हाडे यांनी दिली.
कृषी क्षेत्रात, फळे, भाजीपाला याची गुणवत्ता राखून उत्पन्न वाढीसाठी इस्रायलमध्ये वापरलेले तंत्र याचा अभ्यास करण्यासाठी भारतातील कृषी व फलोत्पादनचे 22 अधिकारी इस्रायल दौर्यावर गेले होते. त्यात रत्नागिरी जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी कुर्हाडे आणि आत्मा प्रकल्प संचालक उर्मिला चिखले यांचा समावेश होता. या पथकाने इस्रायलयमधील गॅलिलीओ संशोधन केंद्राला भेट दिली. आंबा, डाळींब, सफरचंद यासह भाजीपाला लागवडीतील तंत्रांची माहिती घेतली. तेथील संशोधकांसह शेतकर्यांशी संवाद साधला. आंबा लागवडीसाठी इंडो-इस्रायल प्रकल्प भारतात अवलंबला जात आहे. त्याला अनुसरुन आंब्यातील नवीन तंत्र इस्रालयमध्ये विकसित होत आहेत. भविष्यात त्याचा वापर करुन रत्नागिरी जिल्ह्यातील हापूसच्या उत्पादनात वाढीसाठी आवश्यक तंत्र येथील शेतकर्यांना दिले जाणार आहे.
इस्रायलमधील भेटी सध्या आंब्यावर सुरु असलेल्या नवीन संशोधनाविषयी कुर्हाडे म्हणाल्या, तेथील संशोधन केंद्रात घन पध्दतीने 5 बाय 3 मीटर किंवा 5 बाय 4 मीटर अंतरावर झाडे लागवड करण्याचे प्रयोग सुरु आहेत. ही लागवड सध्या 5 बाय 5 मीटर अंतरावर होते. त्याचे अंतर कमी केल्यावर त्याचा फायदा होतो का यावर भर दिला जात आहे. या लागवडीत कोणती आंतरपिके घेतली जाऊ शकतात यावरही भर देण्यात आला आहे. कोकणाप्रमाणेच तिकडे बुरशी आणि डागी आंब्याचा त्रास होतो. त्यावरही संशोधन केले जात आहे. झाडांच्या छाटणीचा प्रयोग तिथे डांळीबावर केला आहे. दर सहा वर्षांनी ते झाड छाटतात. तसेच एका फांदीला दोनच फळं राहतील असे नियोजन केले जाते. फळांचा आकार, गुणवत्ता वाढीसाठी हंगामापुर्वी तेथे शेतकरी नियोजन करतात.