अनुदानावर शेती उपयोगी अवजारे वाटपाचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद कृषी विभागाकडून अनुदानावर शेती उपयोगी अवजारे दिली जाणार आहेत. कृषी समिती अस्तित्वात नसल्यामुळे लाभार्थ्याची निवड करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत.

जिल्हा नियोजनमधून प्राप्त झालेल्या निधीतून दरवर्षी शेतीला आवश्यक अशी अवजारे किंवा साहित्य 75 टक्के अनुदानावर शेतकर्‍यांना उपलब्ध करुन दिले जाते. त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येतात. पाच वर्षांचा कार्यकाल संपल्यामुळे पदाधिकारी, सदस्य नाहीत. अजुनही निवडणुकीसंदर्भात निर्णय झालेला नाही. त्यामुळे जिल्हापरिषदेवर प्रशासकाची नियुक्ती आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात कृषी समितीला 60 लाख रुपयांचा निधी अवजारे, साहित्य खरेदीसाठी प्राप्त झाले आहेत. त्यामधून पॉवर टिलर, ग्रासकटर, प्लास्टीक खोके यासारखी साधने खरेदीसाठी अनुदान दिले जातेे. शेतकर्‍यांकडून जिल्हा परिषद कृषी विभागाकडून 15 जुलैपर्यंत प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. हे प्रस्ताव तालुकास्तरावर पंचायत समित्यांकडे सादर केलेले आहेत. अधिक प्रस्ताव आल्यास लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड केली जाईल. तसेच प्राधान्य क्रम ठरवला गेला असून प्रथम अर्ज सादर करणार्‍याची अनुदानासाठी निवड होईल. नियमानुसार प्रस्ताव सादर केल्यानंतर यादी कृषी समितीमध्ये मंजूरीसाठी ठेवली जाते. त्यावर चर्चा करण्यात येते आणि प्रत्येक तालुक्याला त्याचे वितरण केले जाते; परंतु पदाधिकारी कार्यरत नसल्याचे यादी ठरवण्याचे किंवा लाभार्थी निश्‍चितीचे अधिकार हे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात आले आहे. प्रस्ताव आल्यानंतर महिन्याभरात लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात आले आहे. त्यासाठी जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांनी केले आहे.