जातपडताळणी कार्यालयात अधिकाऱ्यांचे सतरंजी बैठक आंदोलन 

रत्नागिरी:- गेली 2 वर्ष आपल्या न्यायहक्कासाठी झगडणार्‍या सामाजिक न्याय विभागाच्या राजपत्रित अधिकार्‍यांवर आंदोलनाचे निशाण फडकावले आहे. विविध मागण्यांसाठी बुधवारपासून सतरंजी बैठक आंदोलन येथील जातपडताळणी कार्यालयात सुरू झाले असून जातपडताळणी समितीचे अधिकारी सतरंजीवर बसून नियमित कामकाज करत आहेत. या अनोख्या आंदोलनातून शासनाचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

राज्यात गेली 2 वर्ष सामाजिक न्याय विभागातील अधिकार्‍यांनी विविध मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. बारा मागण्या घेऊन गेली 2 वर्ष सामाजिक न्याय विभागाची राजपत्रित अधिकारी संघटना झटत आहे. मात्र अद्याापही त्यांच्या मागण्यांकडे शासनाने लक्ष दिले नाही. वेळोवेळी आश्‍वासने देऊन चालढकल करण्यात आली. आता मात्र सामाजिक न्याय विभागाच्या राजपत्रित अधिकार्‍यांनी आंदोलनाचे निशाण फडकावून सतरंजी बैठक आंदोलन संपूर्ण राज्यात सुरू केले आहे.

रत्नागिरीत गुरुवारपासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. 2 दिवस जातपडताळणी कार्यालयातील अधिकारी आपल्या दालनात सतरंजी अंथरून बसले आहेत व सतरंजीवरूनच त्यांचे कामकाज सुरू झाले आहे. या आंदोलनामुळे आलेल्या अभ्यागतांची गैरसोय होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन अधिकार्‍यांनी आपले कामकाज सुरू ठेवले आहे.

जातपडताळणी कार्यालयातील सहाय्यक आयुक्त प्रमोद जाधव आणि संतोष चिकणे हे दोन अधिकारी सध्या अनोख्या पद्धतीने आंदोलन करून शासनाचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. सहाय्यक आयुक्तांना वेतनश्रेणीत वाढ करावी, मानकीय रचना सुधारावी, डमरुऐवजी पिरॅमिड आवश्यक, सहाआयुक्त व अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नती द्यावी, जातीप्रमाणपत्र पडताळणी  समितीमध्ये समाजकल्याणचे अधिकारी अध्यक्ष नेमावेत, रिक्त पदे तात्काळ भरावीत अशा एकूण 12 मागण्या घेऊन जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या राजपत्रित अधिकार्‍यांनी सतरंजी बैठक आंदोलन सुरू केले आहे.

बुधवारपासून हे आंदोलन सुरू झाल्याने कार्यालयात येणार्‍या प्रत्येकाला अधिकारी जमिनीवर का बसलेत? असा प्रश्‍न पडत आहे. मात्र आमचं आंदोलन सुरू आहे, असे सांगून तुमची गैरसोय होणार नाही, याची आम्ही काळजी घेतली आहे असे अधिकार्‍यांकडून येणार्‍या प्रत्येकाला सांगितले जात आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारादेखील सामाजिक न्याय विभागाच्या राजपत्रित अधिकारी संघटनेने दिला आहे.