रत्नागिरी:- तालुक्यातील चांदेराई बाजारपेठेचे दरवर्षीच्या पुरापासून मुक्तता व्हावी यासाठी हरचेरीतील काजळी नदीतील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु संथ गतीने काम सुरु ठेवल्यामुळे यंदा ते स्वप्न अपुरे राहण्याची शक्यता आहे. आतापर्यंत दोनशे मीटरपर्यंतचा गाळ काढण्यात आला आहे. तर काही गाळ नदीपात्रातच ठेवण्यात आला आहे.
घाटमाथ्यावरुन वाहत येणार्या काजळी नदी गाळाने भरुन गेली आहे. बारीक दगड-गोट्यांचे थर साचलेले आहेत. त्यामुळे दरवर्षी चांदेराई बाजारपेठेत पुराचे पाणी शिरते. मोठा पाऊस पडला की बाजारपेठेत दहा फुट पाणी असते. येथील गाळ काढण्यासाठी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या सौ. देवयानी झापडेकर, माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र झापडेकर यांनी निधीची मागणी केली होती. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामधून २५ लाख रुपयांची तरतूद झाली. पाटबंधारे विभागामार्फत काम सुरु झाले, मात्र त्यात सातत्य नव्हते. एका पोकलेन मशीनने गाळ काढण्याचे काम केले जात होते. याबाबत स्थानिक ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जाऊ लागली. याबाबत पाटबंधारे विभागाला निवेदनही देण्यात आले. पुढे कामाला वेग आला असला तरीही पावसाने ब्रेक लागणार आहे. मॉन्सून दाखल झाला असून काही दिवसात मुसळधार पावसाला आरंभ होईल. या कालावधीत गाळ काढणे अशक्य होणार आहे. आतापर्यंत सुमारे दोनशे मीटर गाळ काढल्याचा अंदाज आहे. काढलेला गाळ किनार्यावर ठेवण्यात आला होता. तो बाजूला काढण्यासाठी एक डंपर लावण्यात आला. पण अजुनही किनार्यावर गाळ तसाच आहे. तो वेळेत काढला नाही तर नदी पात्रातील पाण्यात पुन्हा वाहून जाईल. पात्रातील मोठी झाडे कापून सफाई करण्यात आली आहे. अजुनही सुमारे ७०० मीटरचे काम अपूर्ण राहिल्यामुळे चांदेराई बाजारपेठेला पुरापासून मुक्तता मिळणे अशक्य आहे.









