रत्नागिरीचं ‘पहिलं पाऊल’ उपक्रम आता राज्यभर

शैक्षणिक उपक्रम; सीईओ डॉ. जाखड यांची संकल्पना

रत्नागिरी:- कोरोना कालावधीत पहिलीत प्रवेश केलेल्यांच्या शिक्षणाचा पाया मजबुत करण्यासाठी आणि नवे पाऊल टाकण्यास सज्ज असलेल्या मुलांना अक्षर व अंक ओळखता यावेत यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या संकल्पतून राबवलेल्या ‘पहिले पाऊल’ हा शैक्षणिक उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यात यशस्वी झाला आहे. हा उपक्रम या शैक्षणिक वर्षापासून राज्यस्तरावर राबविण्यात आला आहे.

कोरोनातील परिस्थितीमुळे राज्यात प्रत्यक्ष अध्यापन बंद ठेवण्यात आले होते. पहिलीत प्रवेश घेतलेल्या मुलांचा प्रवेश फक्त हजेरी पटावर प्रत्यक्षात पहिलीच्या वर्गात त्यांचे पहिलं पाऊल पडलेच नाही. पर्याय म्हणून ऑनलाईन अध्यापन चालू होते. पायाच कच्चा राहिल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम झाला. ही परिस्थिती लक्षात घेऊन शिक्षण विभाग आणि महिला बाल कल्याण विभागासह प्रथम फाऊंडेशनच्या मदतीने पहिलं पाऊल हा उपक्रम विद्यार्थ्यांची शाळा पूर्व तयारी करण्याच्या उद्देशाने आखला आहे. यावर्षी पहिलीच्या वर्गात पहिलं पाऊल टाकणारे विद्यार्थी, पहिलीच्या वर्गात न बसताच दुसरीत गेले आणि दुसरीतून तिसरीत जाणार्‍या मुलांवर एप्रिल ते जुन २०२१ या कालावधीत पहिलं पाऊल अंतर्गत मेहनत घेण्यात आली. यासाठी पालकांची मदत शिक्षण विभागाने घेतली. सीईओ डॉ. जाखड यांनी ही संकल्पना राबविण्यासाठी शिक्षणाधिकार्‍यांसह सर्व यंत्रणेला मार्गदर्शन केले होते. गटशिक्षणाधिकारी, अंगणवाडीसेविका, प्राथमिक शिक्षकांमार्फत पालकांशी संवाद साधला. सुट्टीच्या कालावधीत करावयाचे उपक्रम याविषयी माहिती दिली आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवाहन केले. त्याला प्रतिसादही मिळाला होता. दैनंदिन जीवन जगताना घरच्याघरी पालकांच्या सान्नीध्यात राहून मुलांच्या शिक्षणाचा पाया रचला गेला. अंगणवाडी, बालवाडीतील शिक्षण मुलांना घरीच मिळाले. त्यामुळे यंदा पहिलीच्या वर्गात आलेल्या मुलामध्ये आत्मविश्‍वास निर्माण झालेला होता. यामुळे मुलांना शिक्षणाविषयी आवड निर्माण झाली, पहिलीत जाण्यापुर्वीच मुलांना नाव व पत्ता सांगता येऊ लागला, अक्षरे व अंक ओळखता येऊ लागली. या उपक्रमाचे राज्यभर कौतुक झाले असून यामध्ये तळातील शिक्षक, अंगणवाडी व बालवाडी सेविकांची भुमिका महत्त्वाची ठरली.

असा हा उपक्रम

आठ आठवड्यांमध्ये वजन, उंची मोजणे, स्वतःची व कुटुंबाची ओळख, आत्मविश्‍वास निर्माण करणे, वस्तूंची नावे व उपयोग सांगणे, लहान-मोठे फरक ओळखणे, रंग ओळखणे, दोरी उडया मारणे, चित्रे ओळखणे, खेळ किंवा कृती मध्ये सहभागी होणे, कागदापासून होडी बनवणे, भौमितिक आकृती रंगविणे, न घाबरता बोलणे, एक ते दहा अंकांची ओळख, अक्षरे ओळखणे, रंगसंगती, चव, ज्ञानेंद्रियाची माहिती देणे, योग्य जोडी लावणे असे नियोजन केले होते.