मुसळधार पावसात परशुराम घाटातील वाहतूक बंद राहणार

मान्सूनपूर्व आढावा बैठकीत निर्णय

रत्नागिरी:- पालकमंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत मान्सूनपूर्व आढावा बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत अधिक पावसाचा अंदाज वर्तविला गेला असेल तर परशुराम घाटातील वाहतूक तात्पुरती बंद ठेवली जाणार आहे. पूर्ण पावसाळयात येथे 2 जेसीबी व 6 टिप्पर सज्ज असतील व  2 पथके देखील बारा-बारा तास लक्ष ठेवून असतील. घाटाचे काम नव्याने झालेले आहे त्यामुळे पावसात माती रस्त्यावर येण्याची शक्यता गृहीत धरुन वेळीच रस्ता साफ करुन वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता ही व्यवस्था राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि कंत्राटदार यांनी केली आहे असे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी खासदार विनायक राऊत दूरदृश्य प्रणालीद्वारे तर जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी पी.डी. यादव, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर आदि संबधित विभागाचे अधिकारी यावेळी प्रत्यक्ष उपस्थित होते.

 पालकमंत्री ॲड. अनिल परब म्हणाले गेल्या वर्षातील आपत्कालीन परिस्थितीचा विचार करता यावर्षीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते असे धरुनच संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हातळण्यात आपली यंत्रणा कुठेही कमी पडणार याची प्रत्येकांनी खबरदारी घ्या. आपत्कालीन परिस्थितीत तेथील जनतेला तात्काळ मदत मिळण्याच्या दृष्टीने यंत्रणा सक्षमपणे तयार ठेवा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. दामिनी सारख्या ॲपचा येथील जनतेकडून जास्तीत जास्त वापर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा असे ते म्हणाले.

 खासदार विनायक राऊत म्हणाले दरड प्रवण गांवावर जास्त लक्ष ठेवा. दरड कोसळणे टाळण्यासाठी सरंक्षक भिंत सारखी उपाययोजना करा. शास्त्री नदीवरील पुल जुना असून नवीन पुलाच्या एका बाजुचा ॲप्रोच रस्ता झाला असून दुसऱ्या बाजूचा ॲप्रोच रस्ता तात्काळ तयार करुन तो पावसाळा सुरु होण्यापूर्वी सुरु करण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना खासदार विनायक राऊत यांनी दिल्या.

 दरड प्रवण क्षेत्रातील प्रत्येक गावात प्राथमिक अंदाजासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थिती हातळण्यासाठी पोलीस यंत्रणाही सक्षमपणे तयार आहे. सामाजिक संस्थांनाही आपत्कालीन परिस्थिती संदर्भात प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे  जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी सांगितले. यावर्षी आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही आणि निर्माण झालीच तर ती सक्षमपणे हाताळू असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी दिला.