2024 ला भाजपा राज्यात स्वबळावर सत्तेत येईल: रावसाहेब दानवे 

रत्नागिरी:- महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आर्थिक, सामाजिक, राजकीय, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा सर्वच आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कोरोना काळात जनतेला कसलेही पॅकेज दिले नाही. मुख्यमंत्री कोरोना काळात घरात बसून राहिले आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी असे सांगू लागले. त्यांचे कुटुंब खरे तर महाराष्ट्राची १२ कोटी जनता होती, पण त्यांना वाऱ्यावर सोडून ते त्यांचेच कुटुंब सांभाळत होते, अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. २०२४ भाजपा स्वबळावर राज्यात सरकार स्थापन करेल, असा दावासुद्धा दानवे यांनी यावेळी केला.


पीएम केअर योजनेतून बालकांना मदत, प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमासाठी रत्नागिरीत आलेल्या रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण या तिन्हीचे मारेकरी फक्त महाआघाडी सरकारच आहे. ते फक्त इंपेरिकल डाटा केंद्र सरकारकडे मागत राहिले. परंतु स्वतः काही केले नाही. त्याच वेळी मध्यप्रदेश सरकारने हा डाटा गोळा केला आणि तिहेरी चाचणी पार केली. त्यामुळे त्यांना आरक्षण टिकवता आले. याबाबत महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले असून त्यांनी मराठी जनतेचा भ्रमनिरास केला आहे. मराठा आरक्षणाबाबतही हेच केले. या महाविकास आघाडी शासनाला राज्याचे आर्थिक, सामाजिक प्रश्न सोडवायचे नाहीत.

केंद्राने राज्याचे ३८ हजार कोटी रुपये परतावा दिले नसल्याच्या प्रश्नावर रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, एकदा आमने सामने बसूया. मी केंद्राचा प्रतिनिधी म्हणून सांगतो की, जीएसटीचा परतावा दिलेल्या मुदतीत व नियमानुसार दिला जातो. पण महाविकास आघाडी सरकारने केंद्राचे कोट्यवधी रुपये दिलेले नाहीत. परंतु आम्ही उगाच बोंब मारत नाही. दिल्ली-मुंबई कॉरिडॉर, कोळसा सबसिडी, कोकण रेल्वे विद्युतीकरण, दुपदरीकरण, मुंबई-अहमदाबाद महामार्ग अशा विविध योजनांमध्ये राज्य सरकारने निधी दिलेला नाही. त्यामुळे या पैशांबाबतही सांगा नाहीतर आमने-सामने बसू आणि पैसे देण्यासाठी अंतिम वेळ ठरवू, असे आव्हान दानवे यांनी दिले.