रत्नागिरी:- हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्याचा सर्वात मोठा फटका अंतिम टप्प्यात असलेल्या आंबा उत्पादनावर झाला आहे. गुरुवारी (ता. 19) रात्रीपासून पडत असलेला पाऊस शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह सुरुच होता. मान्सूनपूर्वमुळे आता झाडावरील आंबा काढणे देखील अशक्य झाल्याने उरला-सुरला आंबा गळून जाण्याची भिती आहे. यामुळे आंबा व्यावसायिक प्रचंड संकटात सापडला असल्याचे वाटद येथील आंबा बागायतदार उमेश रहाटे यांनी सांगितले.
जिल्ह्यात गुहागर, संगमेश्वर, लांजा आणि रत्नागिरी तालुक्यात काल रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. तर अन्य तालुक्यांमध्ये पहाटेपासून पाऊस सुरू झाला. रत्नागिरीत शुक्रवारी दिवसभर पाऊस सुरुच होता. या पावसाचा सर्वाधिक परिणाम यंदाच्या आंबा हंगामावर झाला आहे.
हंगामाच्या सुरवातीपासूनच आंबा बागायतदारांना बदलत्या वातावरणाला सामना करावा लागला. मोहोर उशिरा आला, थंडी लांबल्यामुळे फळधारणा वेळेत झाली नाही. हे होत असतानाच अवकाळी पावसाने नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, मार्च, एप्रिल आणि मे प्रत्येक महिन्यात हजेरी लावली. मार्चमध्ये तर मुसळधार पाऊस कोसळला. बिघडलेल्या वातावरणामुळे हापूसवर रोगांचा सर्वाधिक प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे यावर्षी पहिल्या दोन टप्प्यात उत्पादन आले मात्र ते कमीच राहीले असे बागायतदार उमेश रहाटे यांनी सांगितले.
5 मे नंतर आंबा उत्पादन वाढले आणि बागायतदारांची तारांबळ उडाली. अंतिम टप्प्यात आंबा उत्पादन वाढून यावर्षीचा खर्च सुटेल अशी अपेक्षा असताना मान्सूनपूर्व पावसाने आंबा बागायतदारांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. पावसामुळे अनेक बागांमध्ये आंबा गळून गेला आहे. त्यामुळे यावर्षी आंबा बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे बाजारातील दरावर देखील परिणाम झाला आहे. दर घसरल्याने बागायतदाराना फटका बसला आहे. कॅनिंगच्या दरावरही परिणाम झाला आहे, असे बागायतदार रहाटे यांनी सांगितले. आंबा आणि काजू बागायती मान्सूनपूर्व पाऊस आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे संकटात सापडल्या आहेत यामुळे तरुण वर्ग या व्यवसायाकडे दुर्लक्षच करत आहेत. बोगस खतांनी उत्पन्नावर परिणाम होत आहे. परजिल्ह्यातील विक्रेते बोगस खताचा पुरवठा बागायतदारांना करतात यामुळे उत्पन्न आणि दर्जा घसरतो. यामुळे बागायतदारांनी स्थानिक विक्रेत्यांकडूनच खताची खरेदी करावी असे आवाहन देखील रहाटे यांनी केले असून मान्सूनपूर्व पावसाने झालेल्या नुकसानीबाबत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आवाज उठवून नुकसानग्रस्त बागायतदारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी देखील आंबा व्यावसायिक रहाटे यांनी केली आहे.