मासेमारी बंदीचा कालावधी 61 दिवसांचाच; 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत मासेमारी बंदी

रत्नागिरी:-महाराष्ट्राच्या सागरी जलदी क्षेत्रामध्ये मासेमारी अधिनियम 1981 नुसार 1 जून ते 31 जुलै या कालावधीमध्ये मासेमारी बंदीचे आदेश जारी झाले आहेत. मासेमारी बंदीचा कालावधी 61 दिवसांचाच ठेवण्यात आला आहे. 

पावसाळ्यातील जून ते जुलै हा कालावधी माशांच्या प्रजननाचा असतो. यामुळे मोठ्या प्रमाणात मासे अंडी घालण्यासाठी व प्रजननासाठी किनार्‍याकडे येतात. मत्स्य उत्पादन वाढीच्यादृष्टीने हा कालावधी महत्त्वाचा असतो. त्यामुळे शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन या कालावधीमध्ये महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम 1981 नुसार 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारीवर बंदी घातली आहे. तसेच वादळी वारे, सोसाट्याचा पाऊस यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी 2 महिने मासेमारी बंद ठेवण्यात येते.
त्यात सलग दुसर्‍या वर्षी कोरोना महामारीचा मोठा फटका बसल्यानंतर नव्याने हा व्यवसाय सुरू करताना मच्छीमारांसमोर अनेक अडचणी आल्या.  कठीण काळ असल्याने अधिक दिवस मासेमारी बंद ठेवावी लागली. मासळी उपलब्ध नसल्याने वर्षभर मच्छीमारांनी तोटा सहन केला. कोरोना आणि नंतर वादळापूर्वी व वादळानंतर काही दिवस मासेमारी बंद होती. यात जवळपास दहा दिवस गेले. याशिवाय समुद्रामध्ये जोरदार वार्‍यामुळे या आधी काही दिवस मासेमारी करता आली नाही. 

राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनार्‍यापासुन 12 सागरी मैलापर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, (सुधारणा), 2021 च्या कलम 14 अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल. तसेच कलम 17 मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लादण्यात येईल.  पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही. बंदी कालावधीमध्ये राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकास अवागमन निषिध्द आहे.

तरी सर्व मच्छिमारी सहकारी संस्था, त्यांचे नौकामालक सभासद व अन्य संबंधितांनी सदर निवेदनाची नोंद घेवून विहीत बंदी कालावधीत यांत्रिकी नौकांद्वारे सागरात मासेमारी केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांनी केले आहे.