गुंदेचा कन्स्ट्रक्शन कंपनीचीही रक्तदात्यांना घरासाठी मोठी ऑफर
रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्हयातील थॅलेसिमिया रुग्ण, गरोदर महिला, आपत्कालीन रुग्ण यांना अत्यावश्यक वेळी रक्ताची गरज असते. ही गरज ओळखून जीवनदान ग्रुप ब्लड नेटवर्कचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांंनी आपल्या वाढदिवसानिमित्त रविवार 15 मे रोजी विनम्रनगर येथे रक्तदान व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या मोफत शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला. या शिबिरात हिमोग्लोबीन, ब्लडप्रेशर, रक्तगट, डायबेटीस, वजन, इसीजी, नेत्र तपासणी, एडस, कॅन्सर उपचार मार्गदर्शन, अमोफत उपचार व औषधे, आवश्यक रक्त तपासण्या, सीबीसी, लिपीड प्रोफाईल, इलेक्ट्रोलाईट थायराईट, कीडनी अशा आजारांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात 12 जणांनी रक्तदान केले तर 175 जणांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. तसेच रक्तदात्यांना चहा, नाष्टा व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.
प्रसिध्दीपासून कोसोदूर असलेल्या जीवनदान ग्रुप 6 वर्षे रक्तदानाचे महत्वपूर्ण काम करत आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानून राजेश नार्वेकर यांनी अनेकांचे प्राण वाचवले आहेत. त्यांनी 6 वर्षामध्ये 58 रक्तदान शिबिरे आणि 33 मोफत आरोग्य शिबिरे घेतली आहेत. या शिबिरातून होणारे रक्त संकलन ते गरजू व थॅलेसिमियाचे रुग्ण यांच्यासाठी मोफत देत आहेत. गेले कित्येक वर्षे हे काम ते करत आहेत. नुकताच त्यांनी रक्तदानातून काळाबाजार करणार्या कोल्हापूर येथील टोळीचा पर्दाफाश केला.
रक्तदान शिबिरावेळी बोलताना राजेश नार्वेकर म्हणाले की, गोरगरीब जनतेला तात्काळ रक्त मिळावे हा आमचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत आम्ही 58 रक्तदान शिबिरे आयोजित केली असून 3500 च्या वर रक्ताच्या बॅग संकलित केलेल्या आहेत. तसेच 3 हजार लोकांना रक्त मोफत देण्यात आले आहे. 37 आरोग्य शिबिरे आतापर्यंत घेण्यात आली आहेत. त्यातून जवळपास 6 हजार लोकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. 2015 नंतर सिव्हीलमध्ये रक्ताचा होत असलेला तुटवडा लक्षात घेवून आम्ही जीवनदान ग्रुपची स्थापना केली.
कोल्हापूर येथील टोळीचा भांडाफोड केल्याविषयी बोलताना ते म्हणाले, कोल्हापूर येथील एक रक्तपेढी रत्नागिरी येथे येवून वारंवार रक्तदान शिबिरे राबवत होती. आणि जमा रक्त कोल्हापूर येथे 900 ते 2800 रुपयांना विकून बक्कळ पैसा कमवत होते. कोल्हापूर हा जिल्हा खूप मोठा आहे. रत्नागिरी जिल्हा खूप छोटा आहे. कोल्हापूरच्या रक्तपेढीचा रत्नागिरी जिल्हयाला काहीही उपयोग होत नाही. उलट रत्नागिरीतील रुग्ण हे कोल्हापूर या ठिकाणी उपचारासाठी जातात. आणि त्यांना तिथे जास्त दराने रक्त विकत घ्यावे लागते. त्यामुळे परजिल्हयातील रक्तपेढीला रक्तदान न करता आपल्या लोकांसाठी रक्तदान करा असे ते म्हणाले.
थॅलेसिमिया आजाराने ग्रस्त रुग्णाविषयी बोलताना ते म्हणाले, थॅलेसिमियाने आजारी असलेल्या 12 वर्षीय मुलाला रक्त मिळाले नाही आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. थॅलेसिमियाचा आजार असलेल्या प्रत्येक रुग्णाला एका महिन्याला किमान 2-3 वेळा बॅग रक्त द्यावे लागते. असे रत्नागिरी जिल्हयात 65 रुग्ण आहेत. गरोदर महिलांचेही प्रमाण जास्त आहे. तसेच आपत्कालीन रुग्ण म्हणजे अपघात ग्रस्त रुग्णांनाही तात्काळ रक्ताची गरज असते. अशावेळी जर डोनर उपलब्ध झाले नाहीत तर आपण कोल्हापुरात डोन आणू शकत नाही किंवा कोल्हापुरातील रक्तपेढी आपल्याला अर्जंटमध्ये रक्तपुरवठा करणार नाही. त्यासाठी आम्ही रक्तदात्यांना आवाहन करतोय की, कोल्हापूरातील रक्तपेढीमार्फत होत असलेली शिबिराला आपण विरोध केला पाहिजे. आपल्या शासकीय रक्तपेढी, रेडक्रॉस रक्तपेढीचा प्राधान्याने उपयोग केला पाहिजे. तसेच आपण जे रक्तदान करणार आहोत हे कोणासाठी करणार आहोत. त्याचे आयोजक कोण आहेत याची खात्री करुन घ्यावी असे त्यांनी सांगितले.
*गुंदेचा कन्स्ट्रक्शनची रक्तदात्यांसाठी मोठी ऑफर*
गुंदेचा कन्स्ट्रक्शन, गणेश इन्फ्रा डेव्हलपर्स यांच्यातर्फे रक्तदान करणार्यांसाठी एक खास ऑफर ठेवण्यात आली आहे. 20 पेक्षा जास्त ब्लड डोनेशन केलेल्यांना, त्यांचा सन्मान म्हणून कृष्णा रेसिडेन्सी, नाचणे येथे फ्लॅट बुक करणार्यांना जीएसटी माफ करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे गुंदेचा यांच्याकडून सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9850652981, 9405436003 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिराला जिल्हा शासकीय रक्तपेढी, रत्नागिरी जिल्हा रूग्णालय, लोटलीकर हॉस्पिटल, हिंद माता लॅब, इन्फिगो आय केअर आणि आयुर केअर पावस, डाॕक्टर तसेच त्यातील सर्व कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.
शिबीराचे उदघाटन रत्नागिरी परकार हाॕस्पिटलाचे सर्जन डाॕ.अमित यादव आणि रत्नागिरीतील प्रसिद्ध पत्रकार उज्वला पंगेरकर मॕडम यांनी दीपप्रज्वलन करुन केले.
यावेळी नाचणेचे सरपंच भैया भोंगले, संतोष सावंत, निलेश गुंदेचा श्रीकांत कुलकर्णी, जितेंद्र बागकर, दिनेश रेमूळकर, रश्मी सोलकर,भाग्यश्री गानू, सुजाता नार्वेकर, निलेश नार्वेकर, रवींद्र रानडे, चंद्रकांत नार्वेकर, अरविंद नादगांवकर, विनायक राज्याध्यक्ष उपस्थित होते.