जिल्ह्यातील चार नगर परिषदांच्या हद्दीतील मतदान केंद्रांची तपासणी

रत्नागिरी:- नगरसेवक पदाच्या निवडणुका पावसाळ्यातच होण्याची शक्यता ओळखून जिल्ह्यातील चार नगर परिषदांकडून मतदान केंद्रांच्या स्थितीची पाहणी केली जात आहे. या पाहणीत जी मतदान केंद्र गळतीमुळे पावसाळ्यात धोकादायक ठरणार आहेत त्यांची दुरूस्ती करून घेण्याचे नियोजन केले जात आहे.

रत्नागिरी नगर परिषदेच्या बहुतांश शाळा मतदान केंद्र म्हणून उपयोगात आणली जातात. त्याचबरोबर काही ठिकाणी खासगी शाळांचाही मतदान केंद्र म्हणून वापर केला जातो. अशा परिस्थितीत रत्नागिरी नगर परिषदेचे बांधकाम विभागाचे अभियंता यतीराज जाधव यांच्यासह जितु विचारे, बंड्या भोंगले, मनिषकुमार बारे आदी अधिकार्‍यांनी रत्नागिरीतील संभाव्य मतदान केंद्रांची पाहणी केली.

पाहणीमध्ये 10 ते 15 टक्के शाळा म्हणजेच मतदान केंद्र पावसाळ्यात गळण्याच्या अवस्थेत आहेत. म्हणजेच 85 ते 90 टक्के मतदान केंद्र मतदान प्रक्रिया पार करून घेण्याच्या सुस्थितीत असल्याचे अभियंता यतीराज जाधव यांनी सांगितले. सर्वोच्य न्यायालयाच्या निर्देशानुसार रत्नागिरीसह चिपळूण, खेड, राजापूर नगर परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश दिल्याने जिल्ह्यातही अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेसह खेड, चिपळूण, राजापूर नगर परिषदांनी आपली तयारी सुरू केली आहे.