रत्नागिरी:-वाहन प्रदूषण नियंत्रण चाचणीचे (पीयूसी) दर वाढले आहेत. आता दुचाकीसाठी 35 रुपयांऐवजी 50 रुपये मोजावे लागतील. पेट्रोलवरील कारसाठी 125 रुपये, तर डिझेलवरील वाहनांसाठी 150 रुपये शुल्क द्यावे लागणार आहेत.
वाहनांद्वारे किती प्रदूषण होते आहे किंवा हे प्रदूषण नियंत्रणात आहे की नाही हे पाहण्यासाठी वाहनांची प्रदूषणासंदर्भातील एक चाचणी केली जाते. या चाचणीला पीयूसी (पोल्युशन अंडर कंट्रोल) म्हणतात. पीयुसी करणारी केंद्रे पेट्रोल पंप, रस्त्यावर, मध्यवर्ती भागात अनेक ठिकाणी असतात. मोबाईल व्हॅनमध्ये ही केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे वाहन चालकांना रस्त्यावरून जाता येताच आपल्या वाहनाची प्रदूषण चाचणी करणे सोपे होते. राज्यात वाहन प्रदूषण नियंत्रण चाचणीचे (पीयूसी) दर गुरुवार दि. 28 एप्रिलपासून वाढले आहेत. परिवहन आयुक्तालयाने त्यासंबंधीचा आदेश नुकताच काढला आहे.
राज्यात गेल्या 10 ते 12 वर्षांत पीयूसीचे दर वाढविले नव्हते. अद्याप 2011 मध्ये निश्चित केलेले दर लागू होते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात पीयूसी केंद्रचालक अडचणीत सापडले होते. त्यातच ‘परिवहन’च्या ऑनलाईन कार्यप्रणालीमुळे पीयूसी केंद्राच्या कामकाजात आमुलाग्र बदल झाला. ऑनलाईन कामकाजासाठी पीयूसीचालकांचा खर्च वाढला. त्यामुळे त्यांचा नफ्याचा टक्का घटला होता. परिणामी पीयूसी केंद्र चालविणेही कठीण झाले होते, असा दावा करून ऑल पीयूसी सेंटर ओनर्स असोसिएशनने गेल्यावर्षी दरवाढीचा प्रस्ताव परिवहन आयुक्तालयाला पाठवला होता. त्यावर परिवहन आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे यांनी परिस्थितीचा अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार परिवहन आयुक्तांनी पीयूसी दरवाढीचा निर्णय जाहीर केला आहे.