रत्नागिरी:-वातावरणातील बदलांमुळे यंदा आंबा उत्पादन अवघे दहा टक्केच राहील अशी स्थिती आहे. याची गंभीर दखल घेऊन राज्य शासनाने आंबा बागायतदारांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा, अशी मागणी कोकण हापूस आंबा उत्पादक संघटनेचे बावा साळवी यांनी केली आहे.
येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, गेली पंचवीस वर्षे आंबा बागायतदार अडचणीत येत आहे. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. हंगामाच्या सुरवातीपासून अवकाळी पाऊस, थंडीचा कडाका, ढगाळ वातावरण यामुळे आंबा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यापासून हापूसचे संरक्षण करण्यासाठी बागायतदाराला औषधांची फवारणी करावी लागली होती. त्यामधूनही पाहिजे तेवढे उत्पादन मिळालेले नाही. दरवर्षी गुढीपाडव्याला 80 हजार ते एक लाख पेटी बाजारपेठेमध्ये दाखल होते; परंतु यावर्षी परिस्थिती बिकट असून अवघी वीस हजारापर्यंतच पेटी कोकणातून गेली. यावरुनच उत्पादन किती कमी आहे हे कुणाच्याही लक्षात येईल. सध्या बाजारात दर मिळत असला तरीही फळ टिकवण्यासाठी अफाट खर्च करावा लागला. बागायतदार हे सर्व सहन करत व्यावसाय करत आला आहे. पण आता ती ताकद उरलेली नाही. शासनाने योग्य वेळी कोकणातील बागायतदाराला सावरले नाही, तर आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही.
तत्कालीन सरकारने कर्ज पुनर्गठनाचे आश्वासन आंबा बागायतदारांना दिले होते; मात्र त्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे 14 टक्के व्याजाने बँकांनी कर्ज वसुली केली. काहींना भविष्यात कर्जही मिळणार नाही अशी स्थिती आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला असून काहींच्या मालमत्ताही सिज करुन ठेवण्यात आल्या आहेत. काही बागायतदारांनी दागिने विकुन हप्ते भरले. आता कोकणवासीयांचा संयम संपत आला असून रस्त्यावर उतरावे लागेल असे श्री. साळवी यांनी सांगितले.









