खरीप हंगामासाठी 22 हजार टन खताची मागणी

रत्नागिरी:-रशिया-युक्रेन युध्दामुळे खरीप हंगामासाठी लागणार्‍या खताचा तुटवडा आणि किंमती वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाकडून आतापासूनच नियोजनाला आरंभ केला आहे. जिल्ह्यासाठी २२ हजार मेट्रीक टन खताची मागणी केली असून १४ हजार ६०० मेट्रीक टन मंजूर झाले आहे. येत्या दोन दिवसात कोकण रेल्वे किंवा महामार्गावरुन ट्रकद्वारे खत दाखल होणार आहे. तुलनेत वीस दिवस आधी खताची व्यवस्था केली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात भातशेतीसह आंबा बागायतदारांना खताची मोठी गरज भासते. मोसमी पाऊस सुरु झाल्यानंतर त्वरीत भातशेतीची कामे हाती घेण्यात येतात. काही जणं मे महिन्याच्या अखेरीस पावसाचा अंदाज घेऊन तर काही शेतकरी जुनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करतात. यंदा रशिया-युक्रेन युध्द झाल्यामुळे खताचा तुटवडा जाणवण्याची भिती वर्तविली जात आहे. खतांच्या किमतीही वाढू शकतात. सध्या शासनाकडून सबसिडी असल्यामुळे किमती स्थिर आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात भाताचे ६८ हजार हेक्टर तर आंब्याचे ७० हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी २२ हजार मेट्रीक टन खताची मागणी जिल्हा कृषी विभागाने नोंदवली आहे. २०२०-२१ ला १४ हजार ५७३  मे.टन खत वापरले गेले होते. २०२२-२३ या वर्षासाठी १४ हजार ६००  मे. टन मंजूर झाले. अनेकवेळा सहकारी संस्था, सहकारी संघ यांच्याकडून मागणी उशिरा झाल्यामुळे खत उशिरा दाखल होते आणि शेतकर्‍यांमध्ये तिव्र नाराजी निर्माण होते. हे लक्षात घेऊन दोन महिने आधीच जिल्ह्यातील सहकारी सोसायटी, सहकारी संघ, खत पुरपवठा कंपन्या आणि आरसीएफचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली. तुटवडा जाणवू नये यासाठी लवकर मागणी नोंदवण्याचे आवाहन केले आहे. आरएसएफनेही खत देण्याची तयारी केली आहे. रेल्वेने किंवा रस्ता मार्गे हे खत येइल. त्यानुसार दोन दिवसात खताची वाहतूक सुरु होणार आहे.