मनसेचे कोकणातील एकमेव नगराध्यक्ष वैभव खेडेकर सहा वर्षांसाठी अपात्र

रत्नागिरी:- मनसेला कोकणात जोरदार झटका बसला आहे. कारण मनसेचे पहिले नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी खेडेकर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून सहा वर्षांसाठी त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे.

नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर ही अपात्रतेची कारवाई केली आहे. रामदास कदम आणि वैभव खेडेकर यांच्या वादाचा फटका खेडेकर यांना बसल्याची चर्चा आहे. यामुळं रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली-खेड विधानसभा मतदारसंघातील राजकारण पराकोटीला पोहचलेलं पाहायला मिळालं.

खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, राष्ट्रवादीचे दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यापासून आपल्याला धोका असल्याचा दावा केला होता. तसंच प्रशासनाकडं पोलीस संरक्षणाचीही मागणी केली होती. त्यांची ही मागणी प्रशासनानं मान्य केली आहे.