परचुरी बावनदीमध्ये बुडालेल्या त्या दोघांचे मृतदेह सापडले

देवरूख:-संगमेश्वर तालुक्यातील परचुरी येथे शनिवारी बावनदीमध्ये बुडून बेपत्ता झालेल्या दोघांचे मृतदेह रविवारी सकाळी शोध मोहिमेदरम्यान ग्रामस्थांना सापडले आहेत. दरम्यान, या दुर्देवी घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. 

परचुरी कळंबटेवाडी येथील प्रमोद रामचंद्र कळंबटे (वय ३५वर्ष), संकेत सहदेव कळंबटे( वय १२ वर्ष ) व अन्य सात जण परचुरी येथील बावनदी मध्ये शनिवारी दुपारी १.३० वाजण्याच्या दरम्यान पोहायला गेले होते. नदीमध्ये पोहत असताना संकेत कळंबटे याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला तसेच तो पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहत गेला. संकेत याला वाचविण्याच्या प्रयत्नात प्रमोद कळंबटे पाण्यामध्ये बुडाला. नदीला भरती आल्याने हे दोघेही नदीमध्ये बुडन बेपत्ता झाले. प्रमोद व संकेत यांच्याचबरोबर आलेल्या पाच जणांनी आरडाओरड केल्याने हा प्रकार ग्रामस्थांना कळला.

संगमेश्वर पोलीसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. होडीच्या साहाय्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली. सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रमोद व संकेत हे मिळून आलेले नाहीत. काळोख पडल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. रविवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. शोध मोहीम सुरू असताना सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास प्रमोद कळंबटे याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना ग्रामस्थांना दिसून आला. ग्रामस्थांनी हा मृतदेह पाण्याबाहेर काढला.

यानंतर होडीच्या सहाय्याने संकेत याचा शोध सुरू होता. १०.१५ वाजता संकेत याचा मृतदेह मिळून आला. या शोध मोहिमेत ग्रामस्थांसह संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देशमुख, सचिन कामेरकर, प्रशांत शिंदे, उशांत देशमवाड सहभागी झाले होते. संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात संकेत व प्रमोद यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शोकाकुल वातावरणात दोघांच्याही पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रमोद व संकेत यांच्या अचानक जाण्याने परचुरी गाव शोकसागरात बुडाला आहे.