रत्नागिरी:- राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे तीन दिवस कोकण दौर्यावर येत असून सिंधुदुर्गमधून 28 मार्च रोजी दौर्याला सुरुवात होणार आहे. 29 व 30 मार्च हे दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ठिकाणांची पाहणी करणार असून विकासकामांचा शुभारंभही त्यांच्या हस्ते होणार असल्याने जिल्ह्यातील पर्यटन विकासाला गती मिळणार आहे.
पर्यटनमंत्र्यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि रत्नागिरीचे आ. उदय सामंत यांनी गणपतीपुळे येथे जाऊन विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आदि संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या दौर्याबाबत ना. सामंत पत्रकारांशी संवाद साधला.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे 29 मार्च पासून जिल्हा दौर्यावर येत असून सिंधुदूर्गमधून ते थेट राजापूर येथील धुतपापेश्वर मंदिराला भेट देणार आहेत. त्यानंतर लांजा येथे शिवसेना पदाधिकार्यांचा मेळावा घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 वा. ते गणपतीपुळे मंदिराला भेट देऊन दर्शन घेणार आहेत. गणपतीपुळे येथील पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे एमटीडीसी येथील बोट क्लबची पाहणी करणार आहेत. येथील एमटीडीसी रिसॉर्टच्या कामाचीही ते पाहणी करणार आहेत. त्याठिकाणाहून ते थेट जयगड येथील फेरीबोटीने वेळणेश्वरला जाणार आहेत. धूपप्रतिबंधक बंधार्याचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते चिपळूण येथे वास्तव्य करणार असून, 30 मार्च रोजी वाशिष्ठी नदीतील गाळउपसा कामाची पाहणी करणार आहेत व कामाचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर दापोली येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ना. आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौर्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन कामांना गती मिळणार आहे. यावेळी त्यांच्या सोबत पालकमंत्री अॅड. अनिल परब उपस्थित राहणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.