जिल्ह्यात 1163 सार्वजनिक तर 2876 खाजगी होळ्या
रत्नागिरी:- फाक पंचमीला जिल्ह्यात 1163 सार्वजनिक तर 2876 खाजगी होळ्या उभ्या झाल्या असून गावागावात ग्रामदेवतांच्या पालख्यांना रुपं लावायला सुरुवात झाली आहे. तब्बल 2 वर्षानंतर ग्रामदेवतांच्या पालख्यांना रुपं लागणार असल्याने चाकरमानीदेखील शिमगोत्सवासाठी मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल होऊ लागले आहेत. 1347 पालख्या जिल्हाभरात घरोघरी फिरणार असून काही पालख्या सहाणेवर विराजमान होणार आहेत.
कोकणात आणि विशेष करून रत्नागिरी जिह्यात शिमगोत्सव जल्लोषात साजरा करण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे. फाक पंचमीला गावागावात होळ्या उभ्या करून शिमगोत्सवाची सुरूवात होते. 8 दिवस हा सण उत्साहात साजरा केला जातो. त्यापमाणे सोमवार 7 मार्च फाल्गुन पंचमी (फाक पंचमी) पासून या जल्लोषी उत्सवाला खर्या अर्थाने सुरूवात झाली आहे. 8 दिवसांनी होळयांचा होम झाल्यानंतर ग्रामदेवतांच्या शिमगोत्सवाला सुरूवात होते. अनेक ठिकाणी ग्रमदेवतांच्या पालख्या शिमगोत्सवाच्या दिवशी होळया घेण्यासाठी मंदीराबाहेर पडतात. ढोल-ताशांच्या गजरात आणि फाकांच्या आवाजात पालख्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येते. काही ठिकाणी तर पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगतो आणि याला हजारो भक्तगण हजेरी लावतात.
शिमगोत्सवाला चाकरमानी मोठ्या संख्येने गावात दाखल झाल्याने गावाचे वातावरण पूर्णत: बदलुन जाणार आहे. नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले चाकरमानी शिमगोत्सवासाठी कोकणात दाखल होतात. फाक, ढोलांच्या निनादाने कोकण दणाणुन निघते. आपापल्या ग्रामदेवतांवरील ग्रामस्थांची निस्सीम भक्ती शिमगोत्सवातून दिसुन येते. प्रत्येक गावातून देवाला कौल लावून नंतर ग्रमदेवतांच्या पालख्या सजू लागल्या आहेत. पालखीत पारंपारिक मुखवटे बसवून देवांना सजवलं जाते. प्रत्येक गावातील ग्रामदेवतांना रुपे चढविली जातात आणि गावांगावांमधून पालखी फिरविली जाते. होळीपासूनच अनेक गावांतील पालख्या दुसर्या गावातील देवांच्या भेटीला बाहेर पडतात. अशा या शिमगोत्सवाची धुम साजरी करण्यासाठी यावर्षी कोरोनाच्या निर्बंधातून काहीशी शिथीलता लाभली आहे. त्यामुळे सारेच या आनंदोत्सवात नव्या जोशाने सहभागी होणार आहेत.









