धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे; सर्वपक्षीय मेळाव्यात निर्धार

राजापूर:- तालुक्यात नव्याने प्रस्तावित असलेल्या धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरातील रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ रविवारी राजापूरात आयोजित करण्यात आलेल्या समर्थन मेळाव्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे असा एकमुखी निर्धार या मेळाव्यात करण्यात आला. तसा सर्व पक्षीय एकमुखी ठराव पारीत करून शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करण्याचा संकल्प या मेळाव्यात सोडण्यात आला.

राजापूर तालुक्यात धोपेश्वर बारसू गोवळ परिसरात प्रस्तावित असलेल्या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा होवून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभुमीवर राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे हा समर्थकांचा आवाज शासनापर्यंत अधिक जोमाने पोहचविण्यासाठी रिफायनरी प्रकल्प समन्वय समिती राजापूरच्या वतीने रविवारी राजापूर शहरातील यशोदिन सृष्टी सभागृहात भव्य प्रकल्प समर्थकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वपक्षीय या समर्थन मेळाव्यात धोपेश्वर बारसू गोवळ परिसरातील स्थानिक जनतेबरोबरच राजापूर तालुक्याच्या पुर्व भागापासून पश्चिम किनारपट्टीपर्यंत पसरलेल्या सर्व गावांतील रिफायनरी समर्थकांनी उत्स्फुर्तपणे या मेळाव्यात हजेरी लावली होती. दुपारी दोन वाजल्यापासुच प्रकल्प समर्थन मेळावा स्थळी समर्थकांनी गर्दी केली होती. तर भाजपा, कॉंग्रेस , राष्ट्रवादी कॉंग्रेस , मनसे आणि शिवसेनेच्या अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहत समर्थन करत धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प झालाच पाहीजे असा नारा दिला.

या मेळाव्याप्रसंगी व्यासपीठावर जि. प. चे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, महिला आघाडी अध्यक्षा सौ. श्रृती ताम्हनकर, भाजपा लांजा तालुकाध्यक्ष महेश उर्फ मुन्ना खामकर, डॉ. सौ. छाया जोशी, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, शिवसेनेच्या जि. प. सदस्या सौ. लक्ष्मी शिवलकर, शिवसेना पं. स. सदस्या सौ. उन्नती वाघरे, सौ. अनामिका जाधव, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, ॲड. यशवंत कावतकर, राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव मजिद पन्हळेकर, राष्ट्रवादीचे संजय ओगले, मनसेचे पुरूषोत्तम खांबल, धोपेश्वर सरपंच दत्ताराम करंबेळकर, उपसरपंच स्नेहा ओगले, माजी सरपंच प्राची शिर्के, गोवळ सरपंच अभिजीत कांबळे, दिनानाथ कोळवणकर, पाचल उपसरपंच किशोर नारकर आदी मान्यवर उपस्थित होते