रत्नागिरीत १० मार्चपासून संगीत नाट्य स्पर्धेची मेजवानी

गोव्यासह राज्यभरातून १६ नाटके होणार सादर

रत्नागिरी:-राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीनंतर आता ६० वी महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरीत येत्या १० मार्चपासून होणार असून गोवा, सोलापूर, मुंबई पुणेसह विविध संस्थांची १६ नाटके सादर होणार आहेत. या स्पर्धेला संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त त्यांचे नाव देण्यात आले आहे.

नवकलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्या कलागुणांमधून व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणावा, यासाठी शासनामार्फत गेली ६० वर्षे राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धा घेतल्या जातात. त्यातीलच राज्य हौशी मराठी संगीत नाट्य स्पर्धा ही एक राज्यस्तरीय स्पर्धा आहे. नुकतीच रत्नागिरी केंद्रावर राज्य हौशी नाट्य स्पर्धा पार पडली. याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता संगीत नाट्य स्पर्धेची राज्यस्तरीय अंतिम फेरी रत्नागिरीत येत्या १० मार्चपासून होणार आहे. त्यामध्ये गोव्यासह राज्यभरातील १६ नाट्यसंस्थांनी सहभाग घेतला आहे. रत्नागिरीच्या स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १० मार्च ते २७ मार्च या स्पर्धा होणार असून केवळ १२ मार्चचा अपवाद वगळता दररोज सायंकाळी ७ वाजता स्पर्धेतील नाट्यप्रयोग सुरू होईल. १२ मार्चला रात्री ९.३० वाजता नाटक सादर होईल तर १५ मार्च आणि २६ मार्च रोजी नाट्यप्रयोग होणार नाही.

संगीत राज्य नाट्य स्पर्धेतील या १६ नाटकांसाठी संयोजकांनी प्रेक्षकांच्या मागणीनुसार स्पर्धेचे सिझन तिकीट तयार केले असून दि. ५ मार्चला सिझन तिकीट विक्री सकाळी १०.३० ते १ वाजता सावरकर नाट्यगृह येथे चालू असणार आहे. एका व्यक्तीला जास्तीत जास्त ३ सिझन तिकीटे मिळातील. केवळ ४५० तिकिटेच उपलब्ध आहेत.यातून सदरकर्त्या प्रत्येक संघाला किमान प्रेक्षक तिकीट विक्रीचा ५०℅ भाग मिळेल असे समन्वयक नंदू जुवेकर यांनी सांगितले. 

१० मार्चपासून रत्नागिरीतील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक संस्थेच्या सं. कट्यार काळजात घुसली या प्रयोगाने स्पर्धेला सुरवात होणार आहे. ११ ला मुंबईतील अमृत नाट्यभारती आयोजित धाडीला राम तिने का वनी,१२ ला दापोली तालुका ब्राह्मण हितवर्धिनी सभा यांचे संगीत गोपिकारमणू स्वामी माझा, १३ ला अस्तित्व मेकर्स फाउंडेशन, सोलापूर निर्मित संगीत स्वप्नवासवदत्ता, १४ ला सावंतवाडीतील क्षितिज इव्हेंटनिर्मित सं. मत्स्यगंधा, १६ ला कलारंग नाट्यप्रतिष्ठान, खंडाळानिर्मित सं. मत्स्यगंधा, १७ ला खल्वायनचे सं. ययाती आणि देवयानी, १८ ला आश्रय सेवासंस्था-रत्नागिरी निर्मित सं. देवमाणूस, १९ ला श्री ओंकार थिएटर्स गोवानिर्मित सं. कट्यार काळजात घुसली, २० ला मुंबईतील परस्पर सहायक मंडळ निर्मित संगीत सुवर्णतुला, २१ ला कामगार अधिकारी कार्यालय, बृहन्मुंबई महापालिका आयोजित सं. पंढरपूर, २२ ला संक्रमण पुणेनिर्मित सं. आरंभी स्मरितो पाय तुझे,२३ ला सान्वी कला मंच मांद्रे, गोवानिर्मित सं. विठू आलो माहेरा, २४ ला मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक क्रीडासंघ, मोरजी पेडणे-गोवा यांचे सं. शिक्का कट्यार, २५ ला श्रुती मंदिर सोलापूर यांचे सं. सूर साज, आणि २७ ला वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली आयोजित सं. तुका म्हणे आता या नाटकाने स्पर्धेची सांगता होणार आहे.