पर्यटन विभागाची मंजूरी; पायाभुत सुविधांमुळे पर्यटकांचा राबत वाढणार
रत्नागिरी– समुद्र किनार्यावरील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाकडून राजापूर तालुक्यातील आंबोळगड आणि कशेळीसाठी दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यातील साठ लाख रुपये पत्तन विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. तर गणपतीपुळेतील जेट बोट क्लबसाठी मंजूर असलेल्या तीन कोटीपैकी 1 कोटी 80 लाख वर्ग केले आहेत. पायाभुत सुविधांसाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे एक दिवसांचे पर्यटन स्थळ म्हणून बसलेला शिक्का पुसण्यास मदत होणार आहे.
पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये 46 कोटी 84 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातील 14 कोटी 34 लाख 92 हजार रुपयांचा निधी त्या-त्या जिल्हाधिकार्यांकडे वर्गही करण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आंबोळगड, गणपतीपुळे आणि कशेळी-अणपुरे समुद्रकिनार्यांचा समावेश आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाकडून पावले उचलण्यात आली आहे. यामध्ये आंबोळगड (ता. राजापूर) समुद्र किनारी पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा विकसित करुन सुशोभिकरण करण्यात येणार आहे. मंजूर झालेल्या कामांमध्ये जोडरस्ता 8 लाख 40 हजार रुपये, पार्किंग सुविधेसाठी 26 लाख 25 हजार रुपये, स्वच्छतागृहांसह इतर सुविधांसाठी 40 लाख रुपये, विद्युत पुरवठा करण्यासाठी 3 लाख 80 हजार यासह इतर योजनांसाठी 19 लाख 20 हजार रुपये असा 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील 30 लाख रुपये पत्तन विभागाकडे सुपूर्द केले आहेत. त्याचबरोबर कशेळी-अणपुरे (ता. राजापूर) येथील किनारी भागात सुविधा उभारण्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामध्येही जोडरस्ता, पार्किंग, स्वच्छतागृह, माहिती फलक आणि विद्युत पुरवठा कामे हाती घेतली जाणार आहेत. मंजूर निधीपैकी 30 लाख रुपये पत्तन विभागाकडे वर्ग केले आहेत. गणपतीपुळेत जेट बोट क्लब उभारण्यासाठी 3 कोटी 3 लाख रुपये मंजूर केले असून त्यातील 1 कोटी 80 लाख रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारी भागामध्ये पर्यटकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्याकडून पाठपुरावा सुरु होता. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही किनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला आहे. गोव्यापाठोपात कोकणातील पर्यटनस्थळांवर फिरण्यासाठी मोठ्याप्रमाणात पर्यटक दाखल होतात. रत्नागिरीतील पर्यटन हे एक दिवसांपुर्तेच मर्यादित आहे. पर्यटनस्थळावर पायाभूत सुविधा आणि निवास व्यवस्था उभारल्या गेल्या तर पर्यटक थांबू शकतो. त्यामधून पर्यटन व्यावसायाला चालना मिळू शकते. राजापूर तालुक्यातील कनकादित्य मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या कशेळी किनारा पर्यटकांना भुरळ घालतो. स्थानिक ग्रामपंचायतीकडून हा बीच विकसित करण्याचा प्रयत्न केला. राज्य शासनाकडून पार्किंग, विद्युत पुरवठासारख्या सुविधा उभारण्यास निधी दिल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांचा राबता वाढण्यास मदत होणार आहे.









