पावसच्या विश्वेश्वर मंदिरात आढळला शिलालेख

रत्नागिरी:- तालुक्यातील पावस येथील श्री विश्वेश्वर मंदिराच्या दीपमाळेजवळ मंदिर जीर्णोद्धाराविषयीचा शिलालेख सापडला आहे. सन १७२५ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याबाबत यात उल्लेख आहे. हा शिलालेख पुण्यातील इतिहास संशोधक महेश तेंडुलकर यांनी वाचला आहे. श्री विश्वेश्वर व श्री सोमेश्वर या दोन्ही मंदिरांची बांधणी सारखी आहे. काष्ठशिल्पे, सारखी दिशा, रचना यात साम्य असल्याने या मंदिरांचे जीर्णोद्धार एकाचवेळी झाले असावेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

 
विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार नानाजी रघुनाथ शेणवी पोतदार यांनी केला, असा शिलालेखावर उल्लेख आहे. थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळातला हा असावा, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. तेंडुलकर यांनी सांगितले की, पावसच्या स्वामी स्वरूपानंद मंदिराजवळच विश्वेश्वराचे मंदिर आहे. मंदिरात गेलो तेव्हा मंदिराची बांधणी सारखी आहे. काष्ठशिल्प सारखीच आहेत. विरेश्वर मंदिराच्यासमोर दीपमाळेजवळ एक शिलालेख भग्नावस्थेत आढळला. सचित्र पावस दर्शन पुस्तकात शिलालेखाचा फोटो दिला आहे; पण त्या विषयी फारशी माहिती नव्हती. त्या वेळी शिलालेख पाहिला, तो वाचता येत नव्हता. तो अभ्यास करून वाचला. अनेक ठिकाणी मंदिर परिसरात शिलालेख वाईट पद्धतीने पडलेले असतात. द्वारशिल्प व त्यातील महत्त्वाचे भाग रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. किमान स्थानिकांनी त्यावर काही करावे. यातून पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल.
तेंडुलकर यांच्या ‘मराठी- संस्कृत शिलालेखांच्या विश्‍वात’ या पुस्तकात ३५९ शिलालेखांचा समावेश आहे. यात रत्नागिरीचे ७ शिलालेख आहेत. मराठा सरदारांनी केलेल्या बांधकामाची माहिती पोहोचवण्यासाठी अभ्यासाची गरज तेंडुलकर यांनी व्यक्त केली.

शके १६४७ विश्वावसू नाम संवत्सरे, या वर्षी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार नानाजी रघुनाथ शेणवी पोतदार यांनी केला, असा सात ओळीतील मजकूर या शिलालेखावर कोरला आहे. सोमेश्वराचा शिलालेख उपलब्ध नाहीये. त्या अर्थी या दोन्ही मंदिरांचा जीर्णोद्धार इ. स. १७२५ ला केलेला असावा, हे स्पष्ट होत आहे. कोकणातल्या मंदिरांच्यादृष्टीने हा इतिहास महत्त्वाचा आहे.