रत्नागिरी:-जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन ग्रामपंचायतीने प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिले. जलजीवन मिशनसाठी केंद्र व राज्य शासनाकडून 15 वित्त आयोगांतर्गत प्रत्येक गावाला अनुदान प्राप्त होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी जल जीवन मिशन जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाविषयी जालगांव (ता. दापोली) येथे कार्यशाळा झाली. या कार्यशाळेचे उदघाटन डॉ. जाखड आणि जिल्हा परिषद कृषी सभापती श्रीमती रेश्मा झगडे यांच्या हस्ते झाले. डॉ. जाखड यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीत माहात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तीक शोषखड्डे बांधकाम पूर्ण करुन घेण्याच्या सुचनाही यावेळी केल्या. सार्वजनिकस्तरावर गांडूळ व नेडॉप खत प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापनसाठी स्थिरीकरण तळे, प्लास्टीक निमुर्लन व व्यवस्थापन करावे आणि ग्रामपंचायतीला हागणदारीमुक्त प्लसचा दर्जा मिळावा यासाठी ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्न करावेत. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून 15 वित्त आयोगांतर्गत प्रत्येक गावाला अनुदान प्राप्त होणार आहे. स्वच्छ भारत मिशनमधून सार्वजनिकस्तरावर सांडपाणी व्यवस्थापनासाठी 5000 हजार पेक्षा कमी लोकसंख्या असणार्या गावाला प्रति व्यक्ती 280 रुपये आणि 5000 हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावाला प्रती व्यक्ती 660 रुपये अनुदान मिळेल. घनकचरा व्यवस्थापनासाठी 5000 हजारपेक्षा कमी लोकसंख्या असणार्या गावाला प्रती व्यक्ती 60 रुपये आणि 5000 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावाला प्रती व्यक्ती 45 रुपये असे अनुदान दिले जाणार आहे. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायतीने प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळ जोडणी देऊन दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्याबाबत सुचना दिल्या. या कार्याशाळेला उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रुपा दिघे, सहाय्यक गट विकास अधिकारी श्रीमती बागल, उप अभियंता उप विभाग ग्रामीण पाणी पुरवठा दापोलीचे श्री. आनंदे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.









