रत्नागिरी:- रमाई आवास योजनेतील लाभार्थी शोध मोहिमेत अनेक पात्र लाभार्थींना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून पावले उचलण्यात आली आहेत. सर्व्हेप्रसंगी अधिकार्यांकडून चुकीची माहिती भरल्यामुळे वंचित रहिलेल्यांची माहिती संकलित करा, अशा सूचना सभापती परशुराम कदम यांनी दिल्या त्यानुसार कारवाई सुरू झाली आहे.
जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या बैठकीमध्ये रमाई घरकुल योजनेचा आढावा घेण्यात आला. ग्रामस्थांकडून आलेल्या तक्रारींवरही चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात 2016 ते 2022 या कालावधीत 5 हजार 684 घरकुलं मंजूर झाली असून त्यातील 5 हजार 163 घरे पूर्ण झाली आहेत. अजूनही 521 घरे अपूर्ण असल्याची माहिती प्रशासनाकडून समितीपुढे ठेवण्यात आली.
यावेळी काही सदस्यांनी जिल्ह्यातील काही चर्मकार आणि बौद्धवाडीमधील घरांच्या सर्व्हेत संबंधित अधिकार्यांकडून सर्व्हेची माहिती चुकीची भरल्याचा मुद्दा मांडला. जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती कदम यांनीही बेलारीमधील एका महिलेची तक्रार आल्याचे अधिकार्यांना सांगितले. घर नावावर नसतानाही किरकोळ चुकीची माहिती ऑनलाईन भरण्यात आल्यामुळे संबंधितांचा प्रस्ताव अपात्र ठरवण्यात आला आहे. त्यामुळे गरज असतानाही अनेकांना रमाई आवासमधून घरे मिळालेली नाहीत. त्यामुळे अऩेकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही.
अनुसूचित जातीच्या व्यक्तींना त्यांच्या बिकट परिस्थितीमुळे स्वतःच्या उत्पन्नातून चांगल्याप्रकारे घर बांधणे शक्य होत नाही. ग्रामीण भागातील बहुतांश लोक कच्च्या घरात राहतात. त्यांच्यासाठी राज्य शासनाने अनुसूचित जातीच्या लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी रमाई योजना हाती घेतली. त्यामुळे जे लाभार्थी वंचित राहिले आहेत, त्यांच्यासाठी प्रयत्न करण्याबाबत सभापती कदम यांनी सूचना दिल्या.