रत्नागिरी:- सातत्याने बदलत जाणारे प्रतिकूल हवामान आणि अवेळी पावसाचे सातत्य यामुळे यंदा आंबा हंगामाच्या आरंभी आलेल्या मोहोरातून अत्यल्प उत्पादन मिळणार आहे तर शेवटच्या टप्प्यात प्रचंड थंडीमुळे मोठ्या प्रमाणात आलेला मोहोरही निकृष्ट ठरल्याने यंदाच्या हंगामातील हापूसचे उत्पादनात घट होणार आहे.
वातावरणात सातत्याने होणार्या बदलांचा परिणाम यंदा हापूसच्या उत्पादनावर होणार आहे. परतीचा पाऊस ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत होता. पुढे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये देखील अवेळी पावसाने हजेरी लावली. त्याचा परिणाम पहिल्या, दुसर्या टप्प्यात हापूस कलमांवर आलेल्या मोहोरावर झाला. यात मोहोर काळा पडून गळून गेला. त्यामुळे त्याचे रुपांतर फळधारणेत झाले नाही. त्या नंतर वाचलेल्या मोहोर सुरक्षिततेसाठी आंबा बागायतदारांनी फवारणीवर भर दिल्यामुळे 5 ते 10 टक्केच उत्पादन हाती लागण्याची शक्यता आहे.
तापमानात असाच चढ-उतार राहिल्यास पुढील पंधरा ते वीस दिवसात आंबा काढणीयोग्य होईल. यंदा अवकाळी पावसातून मोहोर सांभाळण्यासाठी फवारणींचा हात अधिक घ्यावा लागला. काही ठिकाणी जानेवारीत पडलेल्या पावसामुळे कैरी गळून गेली. यंदा विचित्र हवामानाचा फटका हापूसच्या उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार असली दर चढा राहण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर अखेरीस अवकाळीनंतर थंडीला सुरुवात झाली. परिणामी बहुसंख्य झाडांना मोहोर आला. त्या मोहोरामध्येही नर फुले अधिक असल्यामुळे त्यापासून होणारी फळनिर्मिती कमीच राहणार आहे. गेल्या दोन दिवसात थंडीचा जोर कमी झाला होता. पुन्हा वाढला. ही स्थिती राहिल्यास पहिल्या टप्प्यातील आंबा बाजारात येण्यास मार्चचा दुसरा पंधवडा उजाडेल.









