तुतारी एक्सप्रेसच्या माध्यमातून महाविकास आघाडीची कामे जनतेपर्यंत पोहचणार 

रत्नागिरी:- राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. आघाडी सरकारने आपला महाराष्ट्र, आपले सरकार ही घोषणा दिली होती. त्यानुसार विविध लोकहिताच्या योजनाही राबविल्या आहेत. त्या माहितीचे फलक रत्नागिरीत येणार्‍या दादर टर्मिनस-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेसवर लावण्यात आले आहेत. याद्वारे आघाडी सरकारने विकासकामे केल्याचे लोकांपर्यंत पोचवण्यात येत आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर लोकहिताच्या योजना राबविण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार कोकणवासीयांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही दिला आहे. राज्यभरात राबविलल्या योजनांची माहिती लोकांना व्हावी यासाठी तुतारी एक्स्प्रेसवर रंगीत माहिती फलक लावण्यात आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे छायाचित्रही त्यावर झळकले होते. त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब थोरात यांचीही नावे त्यामध्ये आहेत. सागरसंपत्ती या मथळ्याखाली चक्रीवादळात मच्छीमारांना 28 कोटी रुपयांची मदत असा फलक एका बोगीवर झळकला आहे. पैठण येथील संतपीठाचे स्वप्न साकार असा फलक दुसर्‍या डब्यावर लावण्यात आला आहे. महाविकास आघाडीने केलेल्या कामांचा लेखाजोखा या रेल्वेवरील फलकांद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ही गाडी बुधवारी (ता. 9) सकाळी पावणेसात वाजता रत्नागिरी स्थानकात दाखल झाली. प्रत्येक स्थानकावर ही गाडी चर्चेचा विषय बनली होती.