रत्नागिरी:- रत्नागिरी एमआयडीसी येथे लागलेली आग विझवून परतणार्या अग्नीशमन दलाच्या बंबाची शोरुमच्या भिंतीला धडक बसून मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना 6 फेब्रुवारी रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी मिरजोळे एमआयडीसी येथील टीव्हीएस शोरुमच्या मागील बाजूस गवताला आग लागली होती. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशमन बंबाला बोलावण्यात आले होते. ही आग विझवून परत निघत असताना बंबाच्या मागील दरवाजाचे झडप उघडेच होते. या उघड्या झडपाची शोरुमच्या गोडावून मधील भिंतीला धडक बसली. या धडकेत भिंतीचे चिरे व सिमेंटचे ब्लॉक गोडावूनमध्ये असलेल्या नवीन 9 टीव्हीएस कंपनीच्या गाड्यांवर पडले. यात गाड्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.
याबाबतची फिर्याद अमित चंदुलाल पटेल (32, भवानीनगर खेडशीनाका, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार वाहन चालक प्रशांत चव्हाण (रा. अग्नीशमन दल वसाहत, मिरजोळे, रत्नागिरी) याच्यावर भादविकलम 279, 427 वाहन वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल केला आहे.