राजापूरमध्ये टेम्पोला भीषण अपघात; 15 जण जखमी

राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील पन्हळे येथे बारशासाठी जाणाऱ्या छोट्या टेम्पोला शनिवारी सकाळी गंभीर अपघात झाला. या अपघातामध्ये पंधरा प्रवासी जखमी झाले. तर 8 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी कणकवली व कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. 

 जखमींमध्ये मयुरी सुर्यकांत पुजारे (17), रूक्मीणी पोवार (55), आकाश नारायण मांडवे (12), गौरी जनार्दन पुजारे (5), उत्कर्षा रंगनाथ पाटील (4) पारस सुर्यकांत पुजारे (10), विद्या रंगराव पाटील (40), आर्यन रंगराव पाटील (11) हे गंभीर जखमी झाले असून त्यांनी अधिक उपचारासाठी कणकवली तसेच कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. तर मयुरी सुर्यकांत पुजारे (17), अंजनी मधुकर पुजारे (50), सुमित्रा खेमाजी कुडाळकर (65), सुवर्णा सहदेव पुजारे (50), सुहासिनी शिवाजी पुजारे (45), तन्वी वसंत मांडवे (40), मानसी सुर्यकांत पुजारे (45), सुनिता सुरेश पुजारे (55 सर्व राहणार जुवाठी) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. 
 

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी जुवाठी येथील हे सर्व ग्रामस्थ मुला-बाळांसह वारगाव येथे एका बारशाच्या कार्यक्रमासाठी छोटा हत्ती टेम्पोतून जात होते. मुंबई-गोवा महामार्गावरील पन्हळे गावी टेम्पो आला असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो पलटी झाला. याच दरम्यान नाटे पोलीस स्थानकातील प्रसाद शिवलकर हे मालवण येथे आपल्या गावी जात होते. त्यांच्यासमोरच ही घटना घडल्याने त्यांनी तात्काळ महामार्गावरून जाणाऱ्या अन्य वाहन चालकांच्या मदतीने जखमींना तात्काळ उपचारासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. 

एका मुलाचा हात गाडीखाली सापडल होता. त्यामुळे शिवलकर यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने पलटी झालेला टेम्पो उचलून मुलाचा हात बाहेर काढला. त्यानंतर सर्व जखमींना उपचारासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी जखमींवर प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी कणकवली व कोल्हापूर येथे पाठविण्यात आले. या अपघाताची खबर मिळताच जुवाठी येथील शिवसेनेचे पदाधिकारी प्रसाद मोहरकर, सेनेचे उपतालुकाप्रमुख राजन कुवळेकर, कार्यालयप्रमुख मधुकर बाणे, सामाजिक कार्यकर्ते मनोहर गुरव आदींनी रूग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.व त्यान्ना मदत केली .