रत्नागिरी:- दापोलीत यंदा सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. मंगळवारी (ता. 11) 9.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदले आहे. दापोलीबरोबरच जिल्ह्यात सगळीकडेच हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत आहे.
दापोली शहराला (जि. रत्नागिरी) मिनी महाबळेश्वर असे संबोधले जाते. हे समुद्रसपाटीपासून 250 मीटर उंचीवर वसलेले शहर आहे. दापोलीत पडलेल्या अवकाळी पावसानंतर तालुक्यात आता थंडीची लाट आली आहे. यावर्षी 11 जानेवारी रोजी पारा सर्वात कमी म्हणजेच 9.2 अंशावर आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या कृषी विभागातील गिम्हवणे हवामान केंद्रावर यावर्षी 11 जानेवारीला ही नोंद झाली आहे. सोमवारी सकाळ पासून चोवीस तासातील ही नोंद झाली आहे. आठवड्यापूर्वी हे तापमान 11 अंशावर आले होते. दापोलीत सोमवारी कमाल 27.8 आणि किमान 11.7 अंश सेल्सियस इतके आहे. मागील काही दिवसात वातावरणातील गारवा कमी झालेला, मात्र शनिवारी रात्री पडलेल्या अवकाळी पावसाने वातावरणातील संपूर्ण चित्रच बदलून गेले आहे. दापोली शहरात सोमवारी वातावरणात अधिक गारवा वाढल्याने नागरिकांनी सकाळपासूनच गरम वस्त्र परिधान केली होती. थंडगार वातावरणामुळे तालुक्यात आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. राज्याच्या बहुतांश भागांत रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाल्याने थंडीचा कहर वाढला आहे. मुंबईत तर सोमवारी यंदाच्या हिवाळयातील निचांकी तापमानाची नोंद झाली. मुंबई आणि परिसरात सध्या रात्री आणि दिवसाही गारवा जाणवत आहे. दिवसाचे कमाल आणि रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत खूपच घटले आहे.
सर्दी, खोकला वाढणार
वातावरणात कमालीचा गारवा वाढल्यामुळे सर्दी, ताप, खोकला आदी आजारांचा प्रादुर्भाव वेगाने होण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. वाढत्या थंडीमुळे गरम कपड्यांच्या खरेदीकडील नागरिकांचा कल वाढला आहे. स्वेटर, कानटोपी, हातमोजे, पायमोजे यांच्याी खरेदी होत आहे.









