राष्ट्रवादीचा तक्रार अर्ज जिल्हाधिकारी यांनी फेटाळला
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेतील साठवण टाकी बांधण्यासाठी आलीमवाडीतील जागा खरेदीचा सर्वसाधारण सभेने केलेला ठराव रद्द करण्याचा मागणी अर्ज जिल्हाधिकार्यांनी फेटाळला. ‘रनप’च्यावतीने अॅड. नीलांजन नाचणकर यांनी मांडलेली शासकीय परिपत्रके आणि कायदेशीर तरतुदी ग्राह्य धरत जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मिलींद कीर यांचा अर्ज फेटाळल्याचा निकाल दिला.
रत्नागिरी शहरात 73 कोटी रुपये खर्चाच्या नळपाणी योजनेचे काम सुरू झाले. शहरातील पंधरामाड आणि त्या आजुबाजूच्या परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी साठवण टाकीचे बांधकाम आवश्यक होते. त्यासाठी आलीमवाडीतील डोंगरावरची जागा खरेदी करण्याचा ठराव 15 व 16 जुलैच्या सर्वसाधारणमध्ये करण्यात आला. सुमारे 1 कोटी 23 लाख रूपये रनपच्या फंडातून ही जागा खरेदी करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी बहुमताने हे ठराव मंजूर केले.
अर्जदार मिलिंद कीर यांनी आपल्या मागणी अर्जात जागा खरेदीच्या खर्चासह इतर वाढणारा खर्च 4 कोटी पर्यंत जाणार असल्याचे म्हटले होते. रनपची आर्थिक स्थिती फारच बिकट असून, शासनाची जागा घेण्यात यावी, असे अर्जात नमूद करून जागा घेण्याचा आणि त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याचा मंजूर ठराव रद्द करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर साठवण टाक्या बांधण्याचे काम करण्यास स्थगिती देण्याचीही विनंती करण्यात आली होती.
महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगर अधिनियम 1965चे कलम 308 अन्वये हे ठराव रद्द करण्याचा मागणी अर्ज जिल्हाधिकार्यांकडे दिला
होता.
जिल्हाधिकार्यांकडे याप्रकरणी सुनावणी झाली. वकील अॅड. निलांजन नाचणकर यांनी याप्रकरणी रनपची बाजू मांडली. पाणी योजना जनहिताची असून शासन परिपत्रके व कायद्यातील तरतुदी मांडून अर्ज फेटाळण्याची विनंती रत्नागिरी नगर परिषदेच्या वकिलांनी केली होती. कोरोनाच्या नियमावलीत रखडलेला या प्रकरणाचा निकाल जिल्हाधिकार्यांनी नुकताच दिला आहे. दि. 3 नोव्हेंबर 2020 रोजी केलेला हा अर्ज जिल्हाधिकार्यांनी फेटाळण्यात आल्याचा निकाल नुकताच दिला आहे. जनहिताच्याद़ृष्टीने हा अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे जिल्हाधिकार्यांनी आदेशात म्हटले आहे.









