बविआच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात ओबीसींचा यल्गार
रत्नागिरी:- मोठ्या भावाची भूमिका घेऊन ओबीसींना संघटित करण्याचा निर्णय देवरुख (ता. संगमेश्वर) येथे बहूजन विकास आघाडीच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या सामाजिक मेळाव्यात घेण्यात आला. आता सत्तावीस टक्के नाही तर शंभर टक्के जागा ताब्यात घेऊन राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवण्याचा निर्धारही नेत्यांनी आपल्या भाषणात केला. बहुजन विकास आघाडीच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सुरेश भायजे, तानाजी कुळये, शांताराम मालप, अॅड. संदीप ढवळ, प्रदीप उदेक, नंदकुमार आंबेकर, अॅड. स्मिता डफळे, भाई चौगुले, राजू धामणे, नारायण भुरवणे, गजानन वाघे यांनी आपले विचार व्यक्त केले. या मेळाव्याला बहुजन विकास आघाडी, कुणबी सेना आणि ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते. नवीन वर्षाच्या सुरवातीला 9 जानेवारीला रत्नागिरीत पहिली सभा घेण्यात येणार आहे. दर आठवड्याला प्रत्येक तालुकावार सुकाणू समितीतर्फे सभा घेण्यात येणार असल्याचे श्री. भायजे यांनी जाहीर केले. सर्व राजकीय पक्ष्यातील सवर्ण जाणीवपूर्वक ओबीसीचे आरक्षण हिरावून घेत आहेत. पण आपण सारे ओबीसी एक झालो तर विरोधकांना भारी पडू. आपली ताकद असताना जर कोणी मर्कट चेष्टा करणार असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे असे श्री. भायजे सांगितले. ओबीसी समाजात कुणबी हा मोठया संख्येने असल्याने कुणबी पुढाकारची म्हणजे आपण मोठ्या भावाची भूमिका घेऊन सर्वाना ओबीसी झेंड्याखाली संघटित होण्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला.