जि. प. च्या विकास कामांना गती देण्यासाठी विशेष सेल

विक्रांत जाधव; स्थायी समितीमध्ये प्रशासनाला दिल्या सुचना

रत्नागिरी:- जिल्हा परिषद, पंचायत समितीची आचारसंहिता लागण्यापुर्वी विविध विकास कामांची कागदोपत्री मान्यतेसह निविदा प्रक्रिया त्वरीत करावी. या प्रकियेला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेत वेगळा कक्ष स्थापन करण्याच्या सुचना अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी स्थायी समितीत प्रशासनाला दिल्या.

विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपाध्यक्ष उदय बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, सभापती परशुराम कदम, शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर यांच्यासह अन्य सभापती व सदस्य उपस्थित होते. या सभेमध्ये विकास कामांचा आढावा घेण्यात आला. शाखा अभियंत्यासह अन्य कर्मचारी पदे रिक्त असल्यामुळे विकास कामांच्या मान्यता वेळेत होत नाही. परिणामी निविदांना उशिर होतो. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची मुदत मार्च महिन्यात संपुष्टात येणार आहे. त्यापुर्वी कदाचित निवडणुक आचारसंहिता लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक कामांसाठी निधी मंजूर आहे, पण मान्यता नसल्याने निविदा प्रक्रिया केलेली नाही. बांधकाम विभाग वगळता अन्य खात्यामधील कर्मचार्‍यांची मदत घेऊन प्रशासकीय मान्यतेसह पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेत स्वतंत्र सेल स्थापन केला जाणार आहे. या सेलमार्फत कार्यवाही केली जाईल. पुढील दोन महिन्यात बहूतेक कामांच्या निविदा पूर्ण झालेल्या असतील आणि काही कामेही चालु करण्यात येतील असा विश्‍वास विक्रांत यांनी सांगितले.

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील नळपाणी योजनांची मोठी हानी झाली होती. त्यासाठी आवश्यक 15 कोटी रुपयांचा निधी जल जीवनमधून मंजूर झाला आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न करणार्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्यासह पाणी पुरवठा विभागातील अधिकार्‍यांचे स्थायी समितीत विशेष अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. डॉ. जाखड यांनी नादुरुस्त झालेल्या आपत्तीमधील पाणी योजनांसाठी जलजीवन मिशनमधून निधी देता येऊ शकतो हे वरीष्ठ अधिकार्‍यांना पटवून दिले.

त्यामुळेच एवढ्या मोठ्याप्रमाणात निधी मंजूर झाला आहे. सकारात्मक विचारसरणीचे अधिकारी असतील तर जिल्हा परिषदेला निधी मिळवण्यात अडचणी येत नाहीत, अशी प्रतिक्रिया यावेळी अध्यक्ष विक्रांत यांनी नोंदवली.