रत्नागिरी:- सर्व ओबीसींनी राजकीय पक्ष्यांची पदे झुगारून ओबीसी झेंड्याखाली एक होऊन आगामी पंचायत समिती, जिल्हापरिषद निवडणुका लढवल्यास अध्यक्ष ओबीसीचाच बसेल अशी निर्णायक ताकत ओबीसी ऐक्यात आहे, असे प्रतिपादन ओबीसी समन्वय समितीचे नेते सुरेश भायजे यांनी केले.
आंबव (ता. संगमेश्वर) येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, जगात संघटित जनशक्ती ही सर्वश्रेष्ठ असून तीला कोणीच हरवू शकत नाही. बहुसंख्येने असणार्या ओबीसिंचे आरक्षण रद्द करून त्यांना डिवचण्याचा सरकारचा डाव आहे. हे आता ओबीसी समाजाच्या पूर्णपणे लक्षात आले आहे. देशातील सवर्णासाठी 10 टक्के आरक्षण कोणतेही निकष न लावता चिडीचूप मंजूर केले जाते, त्यावर कुणाचे भाष्यही ऐकून घेतले जात नाही, आणि ओबीसीचे आरक्षणाला मात्र जाचक निकष लावून ते काढून घेतले जाते ही सरकारची हिटलरशाही नाही का, इम्पिरिअल डेटाचे निमित्त करून या देशातील संसदेला, न्यायव्यवस्थेला सवर्णांनी बाहुले बनवले असून सवर्ण विरोधी ओबीसी असा नवा वाद निर्माण केला आहे. गेल्या तीस वर्षात 80 टक्के ओबीसी समाज असणार्या रत्नागिरी जिल्ह्यात एकही आमदार, खासदार ओबीसींचा झाला नाही. हे शल्य मनात बोचत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेतील 27 टक्के आरक्षण सरकारने काढून घेतल्याने तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. केवळ सत्ता,संपत्तीच्या जोरावर विविध पक्षातील सवर्ण हे असंघटित ओबीसी ना राजकारणातून हद्दपार करू पहात असतील ते दुर्दैवी आहे. ओबीसींनी स्वार्थासाठी जातीपतीचे राजकारण कधीही केलेले नाही. मात्र जर सवर्ण विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करीत असतील तर ते कदापी खपवून घेतले जाणार नाही.
ते पुढे म्हणाले, ज्या दालनात कायदे बनतात, ते महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळ आणि देशाच्या संसदेत भारतीय घटनेतील तरतुदीनुसार ओबीसीना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण पाहिजे. या न्याय्य हक्कासाठी देशभर आंदोलनाच्या भूमिकेत ओबीसी असताना स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण काढून घेणे म्हणजे जहरी सापाच्या शेपटावर पाय ठेवण्याचा प्रकार आहे. तो सरकारला नक्कीच महागात पडेल.
आंबव येथे झालेल्या बैठकीला नंदकुमार मोहिते, तानाजी कुळये, अॅड. संदिप ढवळ, अॅड सौ. स्मिता डाफळे, नारायण भुरवणे, प्रदीप उदेक, संजय जाबरे, दिलीप बोथले, राजू धामणे, हरिश्चंद्र धावडे, नंदकुमार आंबेकर, दिलीप चौगुले, टी. एस. दुडये, सचिन गिजबिले यांच्यासह संगमेश्वर, चिपळूण, लांजा, राजापूर व रत्नागिरी या पाच तालुक्यातील बहुजन विकास आघाडी, कुणबी सेना, कुणबी समाजोन्नती संघ व ओबीसी समाजातील बांधव उपस्थित होते.