रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे दहा टक्केपेक्षा कमी असतील तरच आंतरजिल्हा बदल्या करा असे शासनाचे आदेश आहेत. रत्नागिरीतील शिक्षकांची पदे चौदा टक्केपेक्षा अधिक असल्याने दहा टक्केचा निकष शिथिल करण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु शासनाकडून त्यावर मार्गदर्शन आलेले नाही. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीने गावाकडे जाणार्या अनेक इच्छुकांच्या आशा मावळल्या आहेत.
जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये मराठी भाषेसाठी 6 हजार 869 शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यातील 5 हजार 915 पदे भरलेली असून 954 रिक्त आहेत. उर्दु विभागाकडे 494 पदे मंजूर असून 391 भरलेली आहेत. त्यातील 103 पदे रिक्त आहेत. दोन्ही मिळून 1 हजार 57 पदे रिक्त आहेत. एकुण पदाच्या 14.2 टक्के पदे रिक्त असल्यामुळे आंतरजिल्हा बदल्या करणे अशक्य आहे. शासनाच्या निकषानुसार दहा टक्केपेक्षा कमी पदे रिक्त असतील तरच बदली प्रक्रिया राबविता येऊ शकते; परंतु जिल्ह्यात आधीच शिक्षक कमी असल्यामुळे शैक्षणिक गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेकडून बदल्या न करण्याचा निर्णय घेतला होता. तरीही गावाकडे जाण्यास इच्छुक असलेले अनेक शिक्षक अधिकारी, पदाधिकार्यांकडे बदल्यांसाठी धाव घेत आहेत. वाढत्या शिफारशी लक्षात घेऊन शिक्षण विभागाकडून रिक्त पदांचा निकष पंधरा टक्के करावा अशी मागणी ग्रामविकास विभागाकडे करण्यात आली होती. त्यावर अजुनही ग्रामविकास विभागाकडून मार्गदर्शन मिळालेले नाही. प्राथमिक शिक्षकांची स्थिती लक्षात घेता बदल्यांच्या निकषात बदल करणे अशक्य आहे. तसेच रिक्त पदांवरुन गोंधळ उडू नये यासाठी जिल्हा परिषद पदाधिकार्यांनीही आंतरजिल्हा बदल्या न करण्यावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीने जाण्यास इच्छुकांचा हिरेमोड झालेला आहे.
दरम्यान, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांनी रिक्त पदे भरली जावीत अशी मागणी करणारे पत्र काही दिवसांपुर्वी शिक्षण विभागाकडून सादर करण्यात आले आहे. त्यावर अजुनही कार्यवाही झाली नाही. जोपर्यंत भरती होत नाही, तोपर्यंत बदल्यांसाठी प्रतिक्षाच करावी लागणार आहे.