अल्टीमेटच्या कालावधीत एसटीचा अवघा एक कर्मचारी कामावर हजर 

रत्नागिरी:- एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी संपावर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांना सोमवार सायंकाळपर्यंतचा अखेरचा अल्टीमेट परिवहन मंत्री ना.अनिल परब यांनी दिला होता, याला रत्नागिरीतील एसटी कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. सोमवारी केवळ एकच कर्मचारी सेवेत हजर झाला. आतापर्यंत 4271 पैकी 662 कर्मचारी सेवेत हजर झाले आहेत. परंतु उर्वरित 3609 कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकार आज काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुमारे महिनाभरापेक्षा अधिक कालावधीपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर महामंडळाच्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू ठेवला आहे. राज्य सरकारने पगारवाढ जाहीर केल्यानंतर सुुमारे 15 टक्के कर्मचारी पुन्हा सेवेत हजर झाले. तर त्यानंतर कारवाईचा इशारा देण्यात आला होता त्याला घाबरून 2 ते 3 टक्के कर्मचारी सेवेत हजर झाले असले तरी अद्यापही बहुसंख्य कर्मचारी संपावर ठाम आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केल्यापासून जिल्ह्यातील विविध डेपोमधील 333 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे तर 237 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. निलंबित करण्यात आलेल्या 333 कर्मचाऱ्यांमध्ये दापोली 48, खेड 35, चिपळूण 35, गुहागर 36, देवरूख 20, रत्नागिरी 30, लांजा 24, राजापूर 6, मंडणगड 23, रत्नागिरी विभागीय कार्यालय 73, भांडार अधिकारी 3 यांचा समावेश आहे. तर सेवासमाप्त झालेल्या 237 कर्मचाऱ्यांमध्ये दापोली 27, खेड 13, चिपळूण 40, गुहागर 26, देवरूख 35, रत्नागिरी 36, लांजा 18, राजापूर 16, मंडणगड 22, रत्नागिरी विभागीय कार्यालय 4 अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

निलंबित केेलेल्या 104 कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये चालक 24, वाहक 31, चालक-वाहक 8, यांत्रिकी कर्मचारी 22, प्रशासकीय कर्मचारी 17, पर्यवेक्षक 1 यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 4271 पैकी 662 कर्मचारी सेवेत हजर झाले  आहेत. सोमवारी शासनाने अखेरचा अल्टीमेट दिल्यानंतर बहुतांशी कर्मचारी हजर होतील अशी आशा महामंडळाला होती. परंतु दिवसभरात केवळ एकच कर्मचारी हजर झाल्याने कर्मचाऱ्यांनी अल्टीमेटला केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोमवारी सायंकाळपर्यंत सेवेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हजर करून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु रत्नागिरीत बहुतांशी कर्मचारी हजर न झाल्याने राज्य सरकार जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी विभागीय कार्यालयामार्फत केली जाणार आहे.
एसटीच्या विभागीय कार्यालयासमोरील आंदोलन कर्मचाऱ्यांनी सुरूच ठेवले होते. सोमवारी सायंकाळी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करून पुन्हा एकदा विलिनीकरणाची मागणी केली आहे.