रत्नागिरी:- जिल्हा परिषदच्या कृषी विभागाकडून शेतकरी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा दौरा मध्यप्रदेशमध्ये गेला आहे. मात्र या शासकीय दौर्यात पदाधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, सदस्य, पदाधिकार्यांचे नातेवाईक यांचाच समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या या अभ्यास दौऱ्यात एकही शेतकरी नाही अशी माहिती समोर आली आहे. या दौऱ्यावर जिल्हा परिषदेकडून लाखो रुपये खर्च करण्यात आले असून याची चौकशी करा अशी मागणी आता करण्यात येत आहे.
शेतकर्यांना नाविण्यपूर्ण उपक्रम तसेच शेतीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी जि.प.च्या कृषी विभागातर्फे दरवर्षी राज्याबाहेर किंवा परजिल्ह्यात एक शेतकरी अभ्यास दौरा काढला जातो. यासाठी शासनामार्फत तरतूदही केली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या दौर्यात शेतकरी कमी आणि लोकप्रतिनिधी जास्त अशी स्थिती असते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे हा अभ्यास दौरा काढण्यात आला नव्हता.
यावर्षी मात्र हा दौरा काढण्यात येत आहे.मध्य प्रदेशमध्ये हा दौरा आयोजित करण्यात आला असून, सोमवारी या दौर्याला सुरूवात झालीय. गुरूवारी हा दौरा समाप्त होणार आहे. एकूण 27 जण या दौर्यासाठी गेल्याची माहिती पुढे येत आहे. यामध्ये पदाधिकारी, जि.प. सदस्य, पदाधिकार्यांचे नातेवाईक यांचीच संख्या सर्वात जास्त असल्याचे दिसत आहे. ज्यांचा संबंध नसतानाही विविध विभागाचे अधिकारी या दौर्यात गेल्याचे दिसून येत आहे. मूळात शेतकरीच या दौर्यात दिसत नसल्याची चर्चा आहे.
एकंदरीत हा दौरा वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अभ्यास दौर्यावर लाखो रुपयांचा खर्च टाकण्यात आला आहे. मुंबईतून विमानाने हे सर्वजण मध्य प्रदेशला गेले आहेत. सोशल मीडियावर विमानातील तसेच विमान तळाच्या बाहेरील फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. तसेच प्राणी संग्रहालय बघतानाचेही फोटो व्हायरल झाले आहेत. यामुळे हा दौरा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियावर या 27 जणांच्या यादीचीही चर्चा रंगली आहे. यादीमध्ये समीर झगडे (पदाधिकार्याचा मुलगा), पर्शुराम कदम, चंद्रकांत मणचेकर, गोपाळ आडिवरेकर, रविकिरण तोडणकर, ओंकार आंबवकर, विजय पोकळे, दीपक नागले, संदीप पवार, दत्ताराम शिवगण, अंकुश जोशी, राजेंद्र मोहिरे, शंकर भुवड, रामचंद्र बांबाडे, महेश नाटेकर, पर्शुराम मोहिते, सुनिल मोरे, अरविंद चव्हाण, अनंत कळंबटे, प्रदीप चोगले, प्रमोद जाधव, विनोद झगडे, संतोष थेराडे, रोहन बने, मोहन मुळये यांचा समावेश आहे.