एसटी बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय; दररोज पाच किलोमीटर पर्यंत पायपीट

रत्नागिरी:- गेले 25 दिवसांपासून एसटी महामंडळाने सेवा बंद ठेवल्यामुळे ग्रामीण भागातील विद्याथ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. 4 ते 5 कि.मी. वर असलेल्या शाळेमध्ये जाणार्‍या विद्यार्थ्यांना नाहक परिणाम सोसावा लागत आहे. खासगी वाहनांचे दुप्पट भाडे असल्याने विद्यार्थ्यांना चालतच शाळा गाठावी लागत आहे. त्यामुळे कित्येक विद्यार्थी शाळेत गैरहजर राहात आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून एस. टी. महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. मात्र याचा विपरित परिणाम आता सामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होऊ लागला आहे. ग्रामीण भागातील एसटी सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळा गाठणे कठीण झाले आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या विभागातर्फे ग्रामीण भागामध्ये शालेय विद्यार्थी एसटीने प्रवास करून शाळा गाठत होते. सुरक्षित आणि परवडेल, असा प्रवास तसेच विद्यार्थिनींना मोफत पास सुविधांमुळे शालेय विद्यार्थ्यांना एसटीचा प्रवास फायदेशीर ठरत होता.
मात्र एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी संप केल्यामुळे कित्येक ठिकाणी एसटी सुविधा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी प्रवास वाहनाचा दुप्पट भाड्याने प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खासगी प्रवास परवडू शकत नसल्यामुळे काही विद्यार्थी 4-5 किमी. अंतर पायी चालूनच शाळा गाठत आहेत.

सध्या पहिली ते चौथीचे वर्गही सुरू झाले आहेत. यामुळे काही ठिकाणी चिमूकल्यांचेही हाल होत आहेत. त्याचबरोबर गेले दोन दिवस पाऊस असल्याने त्याचाही फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. एसटीच्या भाड्यापेक्षा खासगी वाहनाचे भाडे दुप्पट असल्यामुळे भाडे द्यावे कसे? असा प्रश्न येथील विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे पायी चालून शाळा गाठण्याचा विद्यार्थी प्रयत्न करीत आहेत तर काही विद्यार्थी शाळेमध्ये गैरहजर असल्याचे काही शिक्षकांकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात पहिली ते चौथीचे वर्गही सुरू झाले आहेत. 2700 शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थितीही शंभर टक्के आहे.