रत्नागिरी:- ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार कोकणात येणार्या परदेशातील लोकांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यात दुबई, मस्कत, सौदीसह कुवेतमधून 46 जणं दाखल झाले आहेत. त्यांची आरटीपीसीआर चाचणी, कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत का याची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दिली.
करोना संसर्गातून निर्माण झालेला ओमिओक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव टाळण्यासाठी भारतामध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. परेदेशांतून भारतात येणार्या प्रवाशांसाठी नियम कठोर केले आहेत. आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांची विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी सक्तीची केली आहे. कर्नाटक येेथे दोन जणं बाधित सापडल्यामुळे आरोग्य विभागाकडून कडक पावले उचलण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 46 जणं परेदशातून दाखल झाल्याची नोंद आहे. विमानतळावरून प्राप्त झालेल्या यादीवरुन संबंधित लोकांशी आरोग्य यंत्रणेकडून संवाद साधला आहे. त्यांनी कोरोनावरील लस घेतली आहे का नाही, दोन मात्रा पूर्ण आहेत का, आरटीपीसीआर चाचणी केली का याची पडताळणी करण्यात येत आहे. कोरोनाशी निगडीत लक्षणे आढळल्यास किंवा त्यांची चाचणी बाधित आल्यास विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. याबाबत तालुकास्तरावरील वैद्यकीय अधिकार्यांना सुचित केले आहे.
रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 18 जणं परदेशातून आले आहेत. त्यांची माहिती घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. दुरध्वनीवरुन त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यातील 17 जणांशी संपर्क झाला आहे; मात्र एकाशी संपर्क होत नाही. संबंधित व्यक्तीचा मोबाईल नंबर चुकीचा असून जी व्यक्ती बोलत आहे ती वेगळीच असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. संपर्क झालेल्यांची माहिती एकत्रित करण्यात येणार आहे. रत्नागिरीत आलेल्यांमध्ये ओमान 3, सौदी 3, दुबई 3, कुवेत 5, अमरिका 1, इंग्लंड 1 आणि बहरीनमधून 1 जणं आला आहे. यातील काही व्यक्ती रत्नागिरी शहरातील आहेत. ते कामानिमित्त परेदशात गेले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.









