रत्नागिरी:- येथील विठ्ठल मंदिरातील श्री विठोबाची वार्षिक नगरप्रदक्षिणा आज बुधवारी दुपारी १ वाजता मंदिरातून चालू झाली. या वेळी विठुरायाचा जयजयकार करून, आरती करून पालखी निघाली. ग्रामदैवत श्री भैरीबुवाची नगरप्रदक्षिणा वर्षातून दोन वेळा दशमीला निघते. त्यानुसार कार्तिकी एकादशी झाल्यानंतर वैकुंठ चतुर्दशीला म्हणजे आज नगर प्रदक्षिणा काढण्यात आली.
प्रथा, परंपरा जपत ही नगर प्रदक्षिणा संपन्न झाली. यावेळी भाविकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. विठुनामाचा गजर, चौकामध्ये आरती, ढोल-ताशांचा गजर, समुद्रस्नान अशी वैशिष्ट्ये या प्रदक्षिणेची सांगता येतील.
ही नगरप्रदक्षिणा गोखले नाका, धनजीनाका, गवळीवाडा, पोलिस मुख्यालय, जेलनाका, गोगटे कॉलेज, जिल्हा न्यायालय, श्री काशिविश्वेश्वर मंदिर, राजिवडा, खडपेवठार, तेली आळी तळे, चवंडेवठार, पाटील वाडी, श्री दत्त मंदिर, घुडेवठार, मांडवी नाा, मायनाकवाडी, भैरव मंदिर येथे पोहोचली. तिथून ८० फुटी हायवेवरून काळा समुद्र, समुद्रस्नान करण्यात आले. त्यानंतर कुरणवाडी, भाटकरवाडी, श्री सांब मंदिर, जोतिबा मंदिर, श्रीराम मंदिर, पेठकिल्ला, चिंचनाका, मुरुगवाडा, ग्रामदैवत श्री भैरी मंदिर, पांढरा समुद्र, विलणकर सहाणेवर, मिऱ्यारोड पांढरासमुद्र, परटवणे, श्री भार्गवराम मंदिर, सावंतवठार, फगरवठार, वरचा फगर वठार, खेरबाग, डाफळेवाडी, डीएसपी बंगला, आंबेडकरनगर, दर्गा, धनजीनाका, परत श्री विठ्ठल मंदिरात पालखी आली.
दरम्यान, मंदिरात विठोबाला विविध देवतांची रूपं लावण्यात (देखावा) येत आहेत. उद्या याचा शेवटचा दिवस असून त्रिपुरी पौर्णिमेला आकर्षक देखावा करण्यात येणार आहे. कलाकार मनिष शिंदे ही सजावट करत असून मंडळाचे कार्यकर्ते त्यांना मदत करतात. विठ्ठल मंदिरात प्रतीवर्षाप्रमाणे उद्या (ता. १८) सायंकाळी त्रिपुर पाजळला जाणार आहे. यावेळी त्रिपूरपूजन करण्यात येणार आहे. कार्तिकोत्सवात समाप्तीची काकड आरती शनिवारी (ता. २०) सकाळी होईल. त्यानंतर महापूजा ९.३० वाजता, भोवत्या होऊन कार्तिकोत्सवाची सांगता येईल. दुसऱ्या दिवशीपासून नित्य काकड आरती सुरू राहील अशी माहितीसुद्धा श्री विठ्ठल मंदिर संस्थेने दिली.