मच्छीमारांकडून मागणी
रत्नागिरी:- जयगड येथील बेपत्ता नावेद 2 मासेमारी नौकेचा शोध अद्यापही लागलेला नाही. त्या मच्छीमारी नौकेला मोठ्या मालवाहू जहाजाने धडक दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे; मात्र त्या दृष्टीने समुद्राच्या तळाशी जाऊन तपास करण्यासाठीची यंत्रणा वापरण्यात आलेली नाही. नौका बुडाली असल्यास त्याचा शोध घेण्यासाठी पाणबुड्यांची व्यवस्था करण्याची मागणी मच्छीमारांकडून होत आहे.
परिस्थितीजन्य पुरावे सापडलेले असतानाही यंत्रणा समुद्रात वरवर तपास करत आहेत. सर्व्हेक्षण करताना समुद्राच्या तळाशी जाऊन शोध घेण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली गेलेली नाहीत. मालवाहू जहाजाच्या धडकेत ती नौका बुडाली असेल तर तिचा माग काढणे कठीण होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी या घटनेची दखल घेत तपासाचा आढावा घेतला आणि तटरक्षक दलामार्फत तपास सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यात हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली जाणार होती. पृष्ठभागावरच्या तपासापेक्षाही पाणबुड्यांचा वापर करून तळातील सर्व्हे करण्याची गरज असल्याचे अनेक मच्छीमारांची मागणी आहे. या दृष्टीने पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते. परंतु पाणबुडे असलेल्या यंत्रणांचा रत्नागिरीत अभाव असल्यामुळे अद्यापही कार्यवाही झालेली नाही.
नावेद मासेमारी नौका 26 ऑक्टोबरला समुद्रात गेली होती. त्यानंतर नौकेचा किनार्यावरील संपर्क तुटला. चार दिवसानंतर मालकांनी नौका बेपत्ता असल्याची तक्रार जयगड पोलिस ठाण्यात दिली. त्या नौकेला मालवाहतूक करणार्या जहाजाची धडक बसल्याचा अंदाज मच्छीमारांनी व्यक्त केला आहे. नौका बेपत्ता झाल्याच्या दिवशी कोळसा घेऊन जेएसडब्ल्यू कंपनीच्या बंदराकडे येणार्या एका मालवाहू जहाजाच्या कप्तानाने समुद्रात एक वस्तू तरगंत जहाजाजवळ दिसल्याचा संदेश नियंत्रण कक्षाला दिला होता. त्या कॅप्टनने आपले जहाज काही काळ तेथे थांबवलेही होते. पुढे लगेचच संबंधित यंत्रणांकडून सर्व्हेक्षण केले गेले. परंतु तेथे काहीच आढळले नाही. कालांतराने त्याच परिसरात एका खलाशाचा मृतदेह आढळला होता. दुसरा मृतदेहही आढळला होता; मात्र तो किनार्यावर आणता आला नव्हता.









