रत्नागिरी:- राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अभियानातून प्रत्येक गावाला सुमारे २० कोटीचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. या सूचनेप्रमाणे ग्रामपंचायतींनी आराखडा तयार केला तर जिल्ह्याला मनरेगातून बक्कळ निधी मिळण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतनिहाय विचार केला तर सुमारे १६ हजार कोटीच्यावर शासनाकडून निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. यातून जिल्ह्याचा ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणार तो सुजलाम्-सुफलाम् होण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.
मनरेगाअंतर्गत सार्वजनिक तलाव, विहिरी, छतावरील पाणी संकलन, टाक्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून पाणी साठवणे शक्य होणार असून पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी सरपंच, सदस्यांनी पुढाकार घेऊन १०० टक्के गावाचे, प्रभागाचे नियोजन करण्याची गरज आहे. त्यासाठी सरपंचांना विशेष पारितोषिकही देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी गावागावात मनरेगातून प्रयत्न करणे आवश्यक आहे. रत्नागिरी तालुक्यातील पालीजवळील गावात २० कोटी रुपयाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वजनिक तलाव, त्यांचे बांधकामात, सार्वजनिक विहिरी व त्याचे पुनर्भरण याचा समावेश आहे. आखाडे तयार करणाचा प्रयत्न प्रत्येक सरपंचाने केला तर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी सरपंचाने ग्रामरोजगार सेवकांकडून काम करून घेणे आवश्यक आहे.
पाणी साठवणुकीसाठी पैसे आहेत त्यासाठी योजनांही आहेत. त्यातून प्रत्येक गावात सार्वजनिक तलाव होऊ शकतात. या माध्यमातून प्रत्येक गाव समृद्ध होऊ शकतो. छोटया-छोट्या योजना राबवल्याने जळगावातील अणुरे गाव जलसमृद्ध झाले आहे. तेथे प्रत्येक घराच्या छतावरील पाण्यावर पुनर्भरण योजना राबवली आहे. त्यासाठी मनरेगाचा आराखडा प्रत्येक सदस्याने आपल्या प्रभागात तयार केला आहे. ही योजना गांभिर्याने राबवण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या सरपंचांसाठी मनरेगाअंतर्गत विशेष पारितोषिक देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.