दिवाळी सुट्ट्यांचा बुस्टर; जिल्ह्यातील पर्यटनाला सुगीचे दिवस

रत्नागिरी:- दिवाळीच्या मुहूर्तावर जोडून आलेल्या सुट्ट्या पर्यटकांच्या पथ्थ्यावर पडल्या असून गणपतीपुळे पर्यटनस्थळं हाऊसफुल्ल आहेत. सलग दोन दिवशी आठ ते दहा हजार पर्यटकांनी हजेरी लावली असून पुढील दोन दिवस हे चित्र कायम राहणार आहे. त्यामुळे हॉटेल, लॉजिंगसह छोटे-मोठे व्यावसायीकांना दिलासा मिळाला आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर देवदर्शन आणि किनार्‍यावर फिरण्याचा आनंद घेण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, बेळगावसह राज्याच्या कानाकोपर्‍यातील पर्यटक गणपतीपुळेत दाखल झाले आहेत. अनेक पर्यटकांनी महिन्याभरापुर्वीच एमटीडीसी आणि खासगी हॉटेलचे आरक्षण करुन ठेवले होते. दिवाळी पाडवा, भाऊबीज आणि जोडून आलेला रविवार यामुळे पर्यटकांना बाहेर फिरण्यासाठी सुट्टीचा योग जुळून आला. शुक्रवारी (ता. 6) गणपतीपुळे मंदिरात साडेसात हजार जणांनी दर्शनाचा लाभ घेतला तर शनिवारी (ता. 7) दिवसभरात दहा हजार पर्यटकांची हजेरी लागली आहे. सलग दोन दिवस पर्यटकांची वर्दळ वाढल्यामुळे गणपतीपुळे हाऊसफुल्ल झाले होते. दर्शन करुन बाहेर पडणारा पर्यटक किनार्‍यावर फिरण्याचा, समुद्रस्नानाचा आणि समुद्र सफरीचा आनंद घेत होता. सकाळी सात वाजल्यापासून मंदिरातील दर्शन रांगा सुरु होत्या. मास्क, सॅनिटायझिंगसह शारिर अंतर ठेवण्याच्या कोरोनाच्या नियमांचे पालन करवून घेण्यासाठी मंदिर व्यवस्थापन प्रयत्न करत होते. त्यासाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली होती. दिवसातून दोनवेळा मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येते. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर गतवर्षी दिवाळीला मंदिरे दर्शनासाठी खुली केली होती. पण पर्यटकांचा तेवढा कल दिसत नव्हता; मात्र यंदा दिवाळीत जोडून आलेल्या सुट्ट्या आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने पर्यटक निर्धास्तपणे फिरत आहेत. याचा फायदा पर्यटन व्यावसायावर अवलंबून असलेल्यांना झाला आहे. ही गर्दी सोमवारपर्यंत कायम राहील असे येथील व्यावसायिकांनी सांगितले.