रनपच्या सभेत निर्णय; मद्यपींकडून धिंगाणा
रत्नागिरी:- शहरातील माळनाका येथील पालिकेच्या जागेमधील स्टॉलधारकांना हटविण्याचा निर्णय आजच्या विशेष सभेत घेण्यात आला. काल या ठिकाणी काही मद्यपींनी धिंगाना घातल्याने चांगलाच गोंधळ झाला. त्यावरून नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांकडे याची तक्रार केली होती. सभेत त्यांनी हा विषय मांडल्यानंतर पालिकेने हा निर्णय घेतला. तसेच दिवाळी संपेपर्यंत शहरवासीयांना मुबलक पाणी मिळावे, यादृष्टीने व्यवस्था करण्याची मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली. त्याची दखल घेऊन नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी दिवळी संपेपर्यंत शहरवासीयांना मुबलक पाणी देण्याचे आदेश पाणी विभागाला दिले.
पालिकेची विशेष सभा नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन करण्यापूर्वीच शिवसेनेच्या नगरसेविका स्मितल पावसकर यांनी काल घडलेला प्रकार सभागृहा पुढे मांडला. माळनाका येथील पालिकेच्या जागेत व्यायामशाळा आणि रिकामी झाला आहे. या रिकाम्या जागेमध्ये गेल्या काही वर्षांपासून भाजी-पाला व जिवानावश्यक वस्तूंचे स्टॉल लावून स्थानिक आपला उदरनिर्वाह करीत आहेत. इतरवेळी या जागेमध्ये विविध महोत्सव भरविले जातात. मात्र या रिकाम्या जागेचा मद्यपींकडुन गैरवापर होताना दिसत आहे. काल अशाच मद्यपींमध्ये वाद होऊन मारहाणीमध्ये त्याचे रुपांतर झाले. या वादामुळे बाजूच्या नागरिकांनी प्रचंडत्रास सहण कराव लागला. याची तक्रार नगरसेवक निमेश नायर आणि माझ्याकडे आल्या. त्यामुळे याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. तेथील गाळ्याचीही मुदत संपल्याचे यावेळी पुढे आले. यावर नगराध्यक्ष बंड्या साळवी म्हणाले, असे गैरप्रकार घडत असतील तर त्याचा गंभीर विचार करायला हवा. निमेश नायर, स्मितल पावसकर यांच्या तक्रारीवरून माळनाका येथील त्या जागेतील स्टॉल तत्काळ हटविण्यात यावे, असे आदेश त्यांनी दिले.
शहरामध्ये अजूनही पाण्याबाबत ओरड सुरू आहे. दिवाळी सणामध्येतरी नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक राजू तोडणकर यांनी केली. यावर बंड्या साळवी म्हणाले, आम्ही शिळ जॅकवेळमध्ये तिसरा नवीन पंप बसविला आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्राची टाकी क्षमतेपेक्षा जास्त भरत आहे. आता दिवाळी समामध्ये नागरिकांना मुबलक पाणी देणे हे आमचे कर्तव्य आहे. दिवळी संपेपर्यंत नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करा, असे आदेश त्यांनी पाणी अभियंत्यांना दिले.