रत्नागिरी:- आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवार पासून बेमुदत उपोषण छेडणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी आक्रमक पवित्रा घेत अचानक कामबंद आंदोलन पुकारले. यामुळे एसटीची सेवा पूर्णतः ठप्प झाली असून याचा हजारो प्रवाशांना फटका बसला आहे. गुरुवारी सकाळी एसटी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला यामुळे कामावर येणारे अनेक कर्मचारी गावातच अडकले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचार्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एक रकमी दिवाळीपूर्वी देण्यात यावी या मागणीसाठी राज्यभर आंदोलने सुरू असताना रत्नागिरीत विविध संघटनांच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिकाच यावेळी एस्. टी. कर्मचार्यांनी घेतली आहे.
दरम्यान प्रशासना सोबत सुरू असलेली चर्चा फिस्कटल्याने गुरुवारी सकाळपासून एसटी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला. यामुळे एसटीची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.









