रत्नागिरी:- नांदेडमधील विधानसभेच्या पोटनिवडणूकीचे कारण पुढे करून ‘टीईटी’ परीक्षा तिसर्यांदा लांबणीवर टाकण्यात आली आहे. ३० ऑक्टोबरला होणारी परीक्षा दिवाळीनंतर २१ नोव्हेंबर घेण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात २ हजार ७७० उमेदवारांनी टीईटीसाठी नोंदणी केलेली आहे. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या वतीने १९ जानेवारी २०२० नंतर टीईटी परीक्षा झालेली नव्हती. त्यानंतर आधी १० ऑक्टोबर रोजी परीक्षेची तारीख जाहीर झाली होती. मात्र या दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची लेखी परिक्षा होती. एकाच दिवशी दोन परिक्षा नको म्हणून टीईटी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात देगलूर बिलोली या विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे यादिवशी टीईटी घेणे शक्य होणार नाही. ही परीक्षा २१ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे. त्यानुसार सुधारित वेळापत्रकानुसार प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्यासाठी २६ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर अशी मुदत देण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन २१ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४.३० वाजता ठेवण्यात आली असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.









