जिल्ह्यात साडेसात लाख खातेदारांना मोफत ऑनलाईन सातबारा

रत्नागिरी:- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील शेतकर्‍यांना डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सातबारा उतार्‍याची प्रत मोफत उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू आहे. त्याअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे साडेसात लाख खातेदारांना शेतीचा सातबारा मोफत घरपोच देण्याची मोहीम जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सुरू झाली आहे.

जिल्ह्यामध्ये एकूण नऊ लाख 45 हजार 171 सातबारा असून त्यापैकी सात लाख 4 हजार 91 शेतीचे सातबारा आहेत. डिजिटल भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाच्या ई-महाभूमीअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या आज्ञावलीमधून संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीने प्राप्त होणार्‍या शेतजमिनीच्या सातबाराच्या अद्ययावत उतार्‍याच्या प्रती गावांमध्ये संबंधित तलाठ्यांमार्फत प्रत्येक खातेदारास घरोघरी जाऊन मोफत दिल्या जाणार आहेत. त्या दृष्टीने 2 ऑक्टोबरपासून ही विशेष मोहीम जिल्हा प्रशासनातर्फे सुरू करण्यात आली.

आतापर्यंत या मोहिमेच्या अंतर्गत एकूण दहा  हजार शेतकर्‍यांना सातबाराचे वितरण करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापर्यंत सर्व शेतकर्‍यांना मोफत सातबाराचे वितरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी केल्या आहेत. त्यानुसार शेतकर्‍यांना मोफत सातबारा घरपोच वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तहसीलदारांना नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.