रत्नागिरी:- जिल्ह्यात येणार्या नव्या अधिकार्यांना जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी एसओपी तयार करावी, अशी सूचना गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील यांनी गुरूवारी येथे दिली. यावेळी त्यांनी कोव्हिड, अतिवृष्टी, चक्रीवादळ या काळात चांगले काम केल्याबद्दल पोलिस दलाचे अभिनंदन करून पोलिस विभागाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
पोलिस अधीक्षक कार्यालयाला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई तसेच पोलिस विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते. या आढाव्यामध्ये पोलिस विभागाचे मनुष्यबळ, उपलब्ध साधन सामग्री, सुविधा, राबविलेले उपक्रम, जिल्ह्यातील गुन्ह्यांबाबतची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी संगणकीय सादरीकरणद्वारे दिली.
राज्यमंत्री पाटील म्हणाले, कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचे काम पोलिस प्रशासनाने केले आहे. प्रशासनाच्या सर्वच विभागाला पोलिस दलाचे सहकार्य लागत असते. राज्याच्या प्रगतीमध्ये सर्वच विभागांचे योगदान असते, यात पोलिस दलाचाही खारीचा वाटा राहिलेला आहे. सामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम पोलिस यंत्रणा करीत आहे.
जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांच्या विरोधात ‘ऐहसास’ मोहीम राबविली जात आहे. नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे, ही बाब अभिनंदनीय आहे. सायबर गुन्ह्यांबाबतची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी जास्तीत जास्त जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक पोलीस स्थानकात असणार्या दक्षता कमिट्यांमध्ये ज्येष्ठांचा समावेश करण्यात येतो. मात्र या पुढे तरुण-तरुणींनाही यात संधी देण्यात यावी, त्यामुळे त्यांना सामाजिक दायित्वाची जाणिव होईल असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण चांगले आहे. त्यातही प्रथमवर्ग न्यायालयात 80 टक्के गुन्ह्यांत शिक्षा होत असून सत्र न्यायालयात हे प्रमाण मात्र 35 टक्के आहे. सत्र न्यायालयातील शिक्षांचे प्रमाण वाढायला हवे असे त्यांनी स्पष्ट केले. किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागामार्फत पाच ते सहा बोटींमार्फत गस्त सुरु आहे. सुरक्षेमध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावणार्या पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांचे 97 टक्के लसीकरण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही प्रश्नही मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पोलिस दलामार्फत सायबर गुन्ह्यांंसंदर्भात जनजागृती करण्यासाठी बनविण्यात आलेल्या व्हीडिओ क्लिपचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले. तसेच उत्कृष्ट काम करणार्या अधिकारी व अंमलदार यांचा ना. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जिल्हा पोलिसांच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावणार
जिल्हा पोलीस दलाचा सर्व बाबींचा आढावा घेताना, पोलीस मुख्यालय व मुख्यालय परिसरातील वसाहतीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्य मंत्री व गृहमंत्र्यासोबत चर्चा करुन येत्या चार महिन्यात त्यावर तोडगा काढून बजेटमध्ये त्याला मंजुरी घेऊ. हा प्रकल्प म्हाडा, पोलीस गृहनिर्माणकडून बांधायचा यावरही निर्णय घेतला जाणार असल्याचे ना.सतेज पाटील यांनी सांगितले.









