भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केली चौकशीची मागणी
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणारी कॉकटेल इंजेक्शनचा साठा शिल्लक असल्याची बाब पुढे आली असून ३० सप्टेंबरला त्याची एक्स्पायरी डेट संपली आहे. एका बाजूला बाहेरून टेस्टिंग रिपोर्ट येत असल्याने रुग्णसंख्या कमी आहे का व तरीही दररोजचे मृत्यू १ ते ५ या दरम्यान होत आहेत. मग या रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध असूनही का दिले जात नाही, असा सवाल करत याची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात राज्य शासनाकडून कॉकटेल इंजेक्शन पुरवण्यात आली. १ लाख दहा हजार रुपये किमतीचे हे इंजेक्शन आहे. यातील इंजेक्शनची मुदत ३० सप्टेंबरला संपली आहे. त्यापैकी माहितीनुसार १०० इंजेक्शन्स शिल्लक असल्याचे बोलले जात आहे. याची नेमकी आकडेवारी जिल्हा रुग्णालयाने जाहीर करावी. या इंजेक्शनचा उपयोग अनेक रुग्णांना झाला असता, काही लोकांचे जीव वाचवण्यास मदत झाली असती. परंतु ती शिल्लक का राहिली याची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना अधिनियमाप्रमाणे वर्ग १ च्या अधिकाऱ्यामार्फत करावी.
अनिकेत पटवर्धन यांनी पुढे सांगितले की, रत्नागिरीमध्ये खासगी रुग्णालयात हे इंजेक्शन उपलब्ध आहे. त्याची किंमत ६५ हजार रुपये आहे. परंतु ते दोन रुग्णांना दिले जाते. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये. आम्ही सक्षमपणे विरोधक म्हणून काम करत आहोत. जनतेच्या पैशांचा गैरवापर होतोय. वारंवार आम्ही अनेक गोष्टींची पोलखोल करत आहोत. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण त्याच वेळी दररोज मृत्यू होत आहेत.
रुग्ण असतानाही त्यांना कॉकटेल इंजेक्शन्स का दिली जात नाही, याचा खुलासा करावा. आरोग्य विभाग चांगल्या प्रकारे काम करत आहे. परंतु ज्या चुका आहेत त्या आम्ही दाखवत आहोत. वारंवार चुका दाखवूनही चौकशी केली जात नाही. आमदार प्रसाद लाड यांनीही जिल्हा रुग्णालयातील त्रुटींबाबत बैठक घेण्याची मागणी केली आहे. जिल्हा रुग्णालयाची सेवा सुधारली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सुविधा सुधारणे आणि त्याद्वारे जनतेला चांगल्या आरोग्य सेवा सुविधा देणे हे उद्दिष्ट आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील त्रुटी दाखवून सुधारणा घडवून आणण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, असेही अनिकेत पटवर्धन यांनी आवर्जून सांगितले.