सावधान! बिबट्यासाठी फासकी लावल्यास सात वर्षे कारावास 

रत्नागिरी:- बिबट्याच्या शिकारीसाठी फासकी लावणार्‍यांनो सावधान! बिबट्या हा अनुसूचि १ मधील वन्य प्राणी असल्याने त्याची शिकार अथवा त्याला इजा करण्याचा प्रयत्न झाल्यास ७ वर्षे कारावास आणि १० हजार रु. दंडाची तरतूद करण्यात आली आहे. यापुढे याची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे केली जाणार असल्याची माहिती रत्नागिरीच्या वन अधिकारी प्रियांका लगड यांनी दिली. त्या वन सप्ताहा निमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

गेल्या काही दिवसांपासून वन विभागाने शिकार्‍यांचे कंबरडे मोडून काढले आहे. एका मागोमाग एक असा कारवाईंचा बडगा उभारल्याने शिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. त्यातच वन सप्ताह सुरु झाल्याने वन विभागाने आपल्या रात्र गस्तीत देखील वाढ केली आहे. वन्य प्राण्यांना संरक्षण मिळावे यासाठी हा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना त्या पुढे म्हणाल्या की, सगळेच बिबटे हे धोकादायक नसतात. डबे वाजवून, फटाके वाजवून, मोठ्याने आरडाओरडा केल्यास बिबट्या पळून जातो. बिबट्याला हाकलण्याकरीता त्याच्यावर दगड मारु नये किंवा त्याचा पाठलागही करु नये. असे केल्यास बिबट्या जास्त धोकादायक ठरु शकतो. तर ग्रामीण भागात जंगल परिसरात असलेल्या वस्तीतील लोकांनी कामाशिवाय रात्रीचे घराबाहेर पडू नये. आवश्यक असल्यास गटागटाने हातात काठी तसेच बॅटरी सोबत घेऊन घराबाहेर पडावे. रात्री कुत्रे जोरजोरात भुंकत असल्यास जवळपास बिबट्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बिबट्या हा अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. त्याचे अस्तित्व कमी झाले तर अन्नसाखळीतील इतर प्राण्यांवर त्याचा मोठा परिणाम होईल. त्यातच बिबट्या हा अनुसूचि १ मधील वन्य प्राणी असल्याने वन्य प्राण्यास इजा करणे तसेच शिकार करणे हा वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील कलम ९ अन्वये गुन्हा असून तसे केल्यास ६ ते ७ वर्षांचा कारावास व १० हजार रु. दंड अशी तरतूद कायद्यामध्ये करण्यात आली आहे.

या वन्य जीव अधिनियमांतर्गत काही माशांच्या प्रजाती देखील संरक्षीत करण्यात आल्या आहेत. यामुळे विविध प्रकारच्या माशांसोबत काढले जाणारे फोटो हे देखील आता कारवाईस पात्र ठरणार आहेत.
वन्य जीव सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले असल्याचे सांगून ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन वेबिनार वन विभागाच्या माध्यमातून आयोजित केला आहे. या वेबिनारमध्ये वन्य प्राण्यांच्या मालकीसह विविध प्रकारचे साप, त्यांच्या प्रजाती याची माहिती या वेबिनारमधून दिली जाणार आहे.