शासनाच्या 108 रुग्णवाहिकांचा वापर चुकीच्या पद्धतीने

स्थायी समितीत प्रकार उघड; कारवाईच्या सूचना

रत्नागिरी:- शासनाकडून दिलेल्या 108 रुग्णवाहिकांचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. संबंधित व्यवस्थापकावर कारवाई करण्यात याव्या अशी सुचना स्थायी समितीच्या बैठकी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिल्या आहेत.

जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला उपाध्यक्ष उदय बने यांच्यासह सर्व विषय समिती सभापती आणि सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती इंदूराणी  जाखड उपस्थित होत्या. रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात 108 रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतु चुकीच्या पध्दतीने नियोजन होत असल्यामुळे गरजेच्या वेळी रुग्णांना त्या वेळेत उपलब्ध होत नाही. हा प्रकार सदस्यांच्या लक्षात आला होता. त्यावर स्थायी समितीच्या सभेत चर्चा झाली. हे नियोजन करणार्‍या व्यवस्थापकांवर संंबंधित विभागाने कारवाई करावी अशा सुचना अध्यक्षांनी दिल्या आहेत.

कोविड कालावधीमध्ये 108 रुग्णवाहिकांसाठी मागणी करणार्‍या बाधितांच्या नातेवाईकांना उलटसुलट उत्तरे मिळत होती. आधी बेड कन्फर्म करा, नंतर तुम्हाला नेण्याची व्यवस्था केली जाईल असे उत्तर संबंधितांकडून देण्यात आले होते. हा मुद्दा उदय बने यांनी उपस्थित केला होता. तसेच आजारी रुग्णाला दापोलीतून चिपळूणात आणत असताना रिक्षा बंद पडली. त्यावेळी 108 रुग्णवाहिकेसाठी दुरध्वनी करण्यात आला. तेव्हा मदत करण्याऐवजी अशाप्रकारे रुग्ण नेण्यासाठी ही सेवा नसल्याचे उत्तर मिळाले. याबाबत रुग्णवाहिका व्यवस्थापन करणार्‍यांना सदस्य संतोष थेराडे यांनी दुरध्वनी केला असता बंद होता. त्यामुळे रुग्णाला गरज असताना सेवा मिळू शकली नाही. यावर सदस्यांनी तिव्र नाराजी व्यक्त करत व्यवस्थापकांवर कारवाईची मागणी केली होती.

महावितरणचे जिल्हाभरात ज्या-ज्या ठिकाणी ट्रांसफॉर्मर आणि विद्युत खांब आहेत, ती जागा ग्रामपंचायत क्षेत्रात येते. तेथील जागेवर ग्रामपंचायतीचा हक्क असल्याने त्याचा वापर करणार्‍या महावितरणकडून कर आकारणी करावी, अशा सूचना अध्यक्ष विक्रांत यांनी दिल्या आहेत. कर आकारणी केल्यानंतर मिळणार्‍या उत्पन्नातील 50 टक्के रक्कम जिल्हा परिषदेला 25 टक्के रक्कम पंचायत समितीला आणि 25 टक्के रक्कम ग्रामपंचायतींना स्वःनिधीत ठेवावी असे त्यांनी सांगितले.

चिवेलीतील व्यायामशाळेच्या जागेप्रश्‍नी तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांवर कारवाई करा अशी मागणी सदस्यांनी केली होती. याबाबत क्रीडा सचिवांना पत्र देण्याच्या सूचना अध्यक्षांनी दिल्या आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांमार्फत बांधलेल्या बंधार्‍यांच्या अनामत रकमा आणि उर्वरित रक्कम करा असे अध्यक्षांनी सभेत सांगितले. जिल्हा परिषदेच्या पाचवीच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यापुर्वी धोकादायक शाळांची तातडीने दुरुस्त करा असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे सोळा कर्मचारी प्रतिनियुक्तीवर जिल्ह्याबाहेर कार्यरत आहेत. त्यांना तातडीने नोटीस जारी करून रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे हजर करण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या. तसेच जिल्ह्यात गुरांवर आलेल्या संसर्गजन्य आजार यावर तातडीने उपचार व उपाय करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

राजापुरमधील नवोदय विद्यालयात स्थानिक मुलांना प्रवेश मिळावा यासाठी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी तालुकावार दौर्‍यांवेळी प्रत्यक्ष भेट घेऊन तेथील पाहणी करत व्यवस्थापनाशी चर्चा केली. परिणामी रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तेथे या शैक्षणिक वर्षात प्रवेश मिळाला आहे. अन्यथा परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते.